भारतातील आर्थिक मंदी तात्पुत्या स्वरुपाची आहे. आगामी काळात यात सुधारणा होईल. भारतीय बाजारातील घसरण आम्ही पाहिली आहे. ही घसरण थांबून भारत प्रगती करेल. भारताची अर्थव्यवस्था पुन्हा गतिमान होईल, असे मत जॉर्जिवा यांनी व्यक्त केले आहे. जागतिक आर्थिक मंचाने आयोजित केलेल्या कार्यक्रमात त्या बोलत होत्या.
इंडोनेशिया, व्हिएतनाम या देशांसह आफ्रिका खंडातील काही देशांची कामगिरी उल्लेखनीय आहे. मात्र, मॅक्सिकोची कामगिरी समाधानकारक नाही, असेही त्या म्हणाल्या. अमेरिका आणि चीन या देशांमध्ये झालेल्या करारामुळे जागतिक पातळीवर सुरू असलेले ट्रेड वॉरचे संकट काही प्रमाणात कमी झाले आहे. जागतिक अर्थव्यवस्थेचा ३.३ टक्के असलेला दर सकारात्मक नाही, असेही त्यांनी सांगितले.
दरम्यान, २०१९-२० या आर्थिक वर्षांत भारताचा जीडीपी ४.८ टक्के राहील, असा अंदाज आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडून व्यक्त करण्यात आला आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या मते, जागतिक विकासदर चालू आर्थिक वर्षात (२०१९-२०) २.९ टक्के राहील. २०२०-२१मध्ये हा विकासदर किंचित वाढून ३.३ टक्के तर २०२१-२२ या आर्थिक वर्षात तो ३.४ टक्के होईल. ही घसरण नाणेनिधीने गेल्यावर्षी ऑक्टोबरमध्ये व्यक्त केलेल्या अंदाजांच्या तुलनेत आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या प्रमुख अर्थतज्ज्ञ असलेल्या गीता गोपिनाथ यांच्या म्हणण्यानुसार, भारतातील ग्रामीण उत्पन्नाची मंदावलेली वाढ तसेच बिगरबँक वित्तक्षेत्रात असलेला आर्थिक ताण याचा परिणाम होऊन भारतीय अर्थव्यवस्था कूर्मगतीने मार्गक्रमण करत आहे. जागतिक आर्थिक दृष्टिकोन स्पष्ट करताना गोपिनाथ यांनी भारताचा विकासदर घसरून चालू आर्थिक वर्षात (२०१९-२०) ४.८ टक्के राहील, असे नमूद केले आहे. या विकासदरामध्ये २०२०-२१ मध्ये वाढून ५.८ टक्के होईल, तर २०२१-२२ मध्ये तो ६.५ टक्के राहील.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times