शुक्रवारी रात्रीच अमित शहा गुवाहाटी इथं दाखल झालेत. विमानतळावर त्यांच्या स्वागतासाठी आसामचे मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल हजर झाले होते.
ईशान्य लोकशाही आघाडीचे संयोजक हिमंता विश्व सरमा यांनी दिलेल्या माहितीनुसार, आपल्या आसाम दौर्यात भाजपचे ज्येष्ठ नेते अमित शहा राज्य पक्ष कोअर कमिटी आणि बोडोलँड टेरिटोरियल काउन्सिलच्या नवनिर्वाचित सदस्यांची भेट घेणार आहेत.
युनायटेड पीपल्स पार्टी लिबरल – भाजपा – गण सुरक्षा पक्ष या आघाडीच्या २३ सदस्यीय प्रतिनिधीमंडळही यावेळी अमित शहांशी संवाद साधणार आहे, असंही सरमा यांनी स्पष्ट केलंय.
आसामच्या बाताद्रव भागात वैष्णव संत श्रीमंत शंकरदेव यांच्या जन्मस्थळाच्या सुशोभीकरणासाठी पायाभरणीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलाय. या सोहळ्यालाही अमित शहा हजर राहणार आहेत.
केंद्रीय गृहमंत्री शहा ८६० कोटी रुपये खर्च करून गुवाहाटी इथं उभारल्या जाणार्या देशातील सर्वात मोठे वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाचं शिलान्यासही करणार आहेत, अशी माहितीही सरमा यांनी दिलीय.
मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल आणि राज्य सरकारचे वरिष्ठ अधिकारी गृहमंत्र्यांशी राज्याशी संबंधित विविध विषयांवर चर्चा करणार आहेत.
रविवारी सकाळी अमित शहा प्रसिद्ध कामाख्या मंदिरात प्रार्थना करतील. त्यानंतर ते मणिपूरकडे रवाना होतील. इथं ते विविध योजनांचं उद्घाटन करणार आहेत. रविवारी सायंकाळी अमित शहा दिल्लीकडे रवाना होतील.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times