पेइचिंगः चीनमध्ये वेगाने पसरत चाललेल्या विषाणूमुळे जागतिक स्तरावर चिंतेचे वातावरण आहे. अशातच आपल्या आजारी मुलांना विमानतळावर सोडून पालक दुसरीकडे स्थलांतरीत झाल्याची धक्कादायक घटना चीनमधील पेइचिंग भागात घडली आहे.

करोना विषाणूमुळे चीनमध्ये आतापर्यंत २६ जणांचा मृत्यू झाला आहे. हे विषाणू संसर्गजन्य असल्यामुळे चीनमधील हजारो नागरिकांना याची लागण झाली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून चीनमधील १४ शहरे बंद ठेवण्यात आली आहेत. त्याचप्रमाणे रेल्वे, बस आणि विमानतळावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. चीनमधील ४.१ कोटी नागरिकांना मजबुरीने आपापल्या घरात बसून राहावे लागत आहे.

चीनी मीडियाने दिलेल्या माहितीनुसार, नजिंग विमानतळावर दोन मुलांसह पालक दुसऱ्या जागी जात होते. मात्र, मुलाला ताप आल्यामुळे विमान प्रशासनाने या पालकांना प्रवास करण्यापासून मज्जाव केला. पालकांनी वाद घालत मुलांना सोबत नेणारच, असा निर्धार केला. या वादामुळे पोलिसांना या प्रकरणी हस्तक्षेप करावा लागला आणि शेवटी ते पालक आपल्या मुलांना न घेताच विमान बसले. या घटनेमुळे विमानतळावर उपस्थित प्रवाशांच्या भूवया उंचावल्या. या घटनेची छायाचित्रे व्हायरल झाली. या छायाचित्रांमध्ये दोन मुले विमानतळावर एकटी बसल्याचे दिसत आहे. काही वेळानंतर विमान कंपनीने मुलांना प्रवासाची परवानगी दिली.

दरम्यान, करोना विषाणूचा प्रभाव चीनमधील कोट्यवधी नागरिकांवर पडला आहे. भारतानेही चीनमध्ये जाणाऱ्या प्रवाशांना मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. चीनमधील प्रसिद्ध ग्रेट वॉल ऑफ चायना आणि डिज्नीलँड बंद ठेवण्यात आले आहे. तर दुसरीकडे, चीनमध्ये करोना विषाणूच्या संसर्गामुळे बळी गेलेल्यांची संख्या पाहता बीजिंगमधील भारतीय दूतावासाने या वर्षी भारतीय प्रजासत्ताक दिन समारोहाचे आयोजन न करण्याचा निर्णय घेतला आहे.

चीनमध्ये राहणाऱ्या सर्व भारतीयांना सर्वतोपरी मदत दिली जाईल, असे चीनी अधिकाऱ्याने सांगितल्याचे भारतीय दूतावासाने काढलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे. आणि आसपासच्या परिसरात ७०० भारतीय विद्यार्थी राहतात. या विद्यार्थ्यांपैकी बरेचसे विद्यार्थी वैद्यकीय शिक्षण घेत आहेत. यामुळे करोना विषाणू संसर्ग हा भारतीयांसाठीही चिंतेचा विषय बनला आहे. चीनमध्ये करोना या जीवघेण्या विषाणूचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी वुहानसह हुआंगगँग शहरांचा संपर्क इतरांपासून तोडण्यात आला आहे. या दोन शहरांना जोडणाऱ्या रस्ते, रेल्वे आणि विमानसेवा तातडीने बंद करण्यात आल्या आहेत.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here