‘मराठा समाजाचा समावेश ओबीसी आरक्षणात करावा, याला विरोध असणारच,’ असे सांगून वडेट्टीवार पुढे म्हणाले, ‘मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण द्या, अशी शिफारस गायकवाड आयोगाने केली आहे. ओबीसीमधून आरक्षण द्या, असे त्यांनी म्हंटले नाही. त्यामुळे आपण स्वतंत्र प्रवर्ग तयार करीत मराठा समाजाला आरक्षण दिले. पण दुर्देवाने त्याला न्यायालयात स्थगिती मिळाली. राज्यात लागू झाले होते. अनेक विद्यार्थ्यांना त्याचा लाभही मिळाला होता. मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मंत्री अशोक चव्हाण यांनी जेवढी मेहनत घेतली, तेवढी मेहनत मेटे यांच्या सात पिढ्या देखील घेऊ शकत नाही. मेटे हे राजकीय दृष्टीने अशोक चव्हाण यांना समितीवरून हटवण्याची मागणी करीत असून त्यांची भूमिका ही राजकीय प्रेरीत आहे. पण चव्हाण यांच्यावर आरोप केल्यावर आम्ही स्वस्थ बसणार नाही, असा इशाराही वडेट्टीवार यांनी विनायक मेटे यांना दिला. मराठा समाजाला न्याय मिळावा, यासाठी अशोक चव्हाण हे प्रामाणिकपणे काम करीत आहेत. सुप्रिम कोर्टात वकिलांची फौज उभी करणे, सरकार म्हणून जेवढे नामवंत वकील उभे करण्याची गरज आहे तेवढे वकील उभे करणे, त्यांना माहिती पुरवणे, ही कामे अशोक चव्हाण यांनी केले आहे. काहीतरी नवीन मार्ग काढून मराठा समाजाला कुठल्याही परिस्थितीत न्याय मिळाला पाहिजे, त्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. पण हा मुद्दा राजकीय हेतून प्रेरित ठेवण्याचा उद्देश मेटे यांचा दिसत असून त्यामुळेच ते अशोक चव्हाण यांना समितीवरून हटवण्याची मागणी करीत असल्याचा आरोपही वडेट्टीवार यांनी केला.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times