काठमांडू: नेपाळ कम्युनिस्ट पक्षात फूट टाळण्यासाठी चीनने त्यांच्या कम्युनिस्ट पक्षातील वरिष्ठ नेत्यांना नेपाळला रवाना केले आहे. चीनच्या कम्युनिस्ट पक्षाच्या आंतरराष्ट्रीय घडामोडींविषयक आघाडीचे उपमंत्री कुओ येचौ हे आज नेपाळमध्ये येत आहेत.

नेपाळचे पंतप्रधान के. पी. शर्मा ओली आणि माजी पंतप्रधान पुष्प कमल दहल प्रचंड यांच्यात गेल्या अनेक महिन्यांपासून धुसफूस सुरू असून, त्यामुळे पक्षात फूट अटळ आहे. प्रचंड यांनी काही दिवसांपूर्वी ओली यांची कम्युनिस्ट पक्षाच्या अध्यक्षपदावरून हकालपट्टी केली होती. त्यानंतर ओली यांनी नेपाळ संसद विसर्जित करून निवडणुकांची घोषणा केली. या घडामोडींमुळे नेपाळ कम्युनिस्ट पक्षात फूट अटळ मानली जात आहे. या पार्श्वभूमीवर चीनचे नेपाळमधील राजदूत होऊ यांकी यांनी दोन्ही गटाच्या नेत्यांची भेट घेऊन वाद टाळण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याला यश आले नाही. त्यानंतर होऊ यांनी तसा अहवाल चीनच्या नेत्यांना पाठविला. त्यानंतर चीनने येचौ यांच्या नेतृत्वाखाली चार सदस्यांची समिती नेपाळला पाठविण्याचा निर्णय घेतला.

हे चारही नेते आज, रविवारी नेपाळमध्ये येणार आहेत. नेपाळी कम्युनिस्ट पक्षाच्या दोन नेत्यांनी याला दुजोरा दिला. ही समिती चार दिवस नेपाळमध्ये राहणार असून, परिस्थितीचा आढावा घेऊन दोन्ही गटाच्या प्रमुख नेत्यांशी चर्चा करणार आहे. तर, चिनी दूतावासाने याबाबत काहीही भाष्य केले नाही.

चीनने नेपाळमधील राजकीय घडामोडींमध्ये हस्तक्षेप करण्याचा हा पहिलाच प्रसंग नाही. याआधीही चीनने नेपाळच्या राजकारणात हस्तक्षेप केला आहे. या हस्तक्षेपाच्या निषेधार्थ नेपाळमधील विद्यार्थ्यांनी जुलैत चीनच्या दूतावासाबाहेर निदर्शनेही केली होती.

वाचा:

मंत्रिमंडळात बदल

दरम्यान, ओली सरकारने संसदेच्या वरिष्ठ सभागृहाचे येत्या एक जानेवारीपासून हिवाळी अधिवेशन बोलावले आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीत या संदर्भात निर्णय घेण्यात आला. तशी शिफारसही राष्ट्रपती विद्या देवी भंडारी यांना करण्यात आली. ओली यांनी शुक्रवारी मंत्रिमंडळाची बैठक घेण्यापूर्वी मंत्रिमंडळात बदल केले. यात आठ मंत्र्यांचा नव्याने समावेश करण्यात आला. त्यातील पाच नेते हे माजी माओवादी नेते आहेत. पाच मंत्र्यांची खाती बदलण्यात आली आहेत.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

162 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here