प्रवीण चौधरी/ म. टा. प्रतिनिधी, जळगाव: जिल्हा प्रशासनाने आरोग्य यंत्रणेच्या मदतीने ब्रिटन प्रवासाची पार्श्वभूमी असणाऱ्या जिल्ह्यातील ७ जणांना खबरदारी म्हणून ‘होम क्वारंटाइन’चा पर्याय सूचवला आहे. येत्या काही दिवसांत करोनाची लक्षणे आढळली तर, आरोग्य यंत्रणेला त्वरित सूचित करण्याचे निर्देश संबंधितांना देण्यात आले आहेत.

ब्रिटनमध्ये करोना विषाणूचा नवा प्रकार आढळून आला आहे. त्यामुळे जगभरातील आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारच्या आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय, तसेच महाराष्ट्र शासनाकडून मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत. या नव्या प्रकारच्या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी इंग्लंडमधील विमानसेवा २३ डिसेंबरपासून बंद केली आहे. विमानतळावरही विशेष खबरदारी घेतली जात आहे. परदेशातून आलेल्या प्रवाशांच्या आरोग्य तपासणीवर भर देण्यात आला आहे.

ब्रिटन प्रवासाची पार्श्वभूमी असणाऱ्या लोकांचा शोध घेण्यासाठी जळगाव जिल्ह्यात जिल्हा प्रशासनाच्या वतीने आरोग्य यंत्रणेच्या मदतीने सर्वेक्षण सुरू आहे. आतापर्यंत सात जणांची माहिती मिळाली आहे. त्यात सर्वाधिक चार जण हे भुसावळ तालुक्यातील कुऱ्हा येथील आहेत. त्याचप्रमाणे चाळीसगाव येथील २ आणि जळगाव शहरातील १ एका व्यक्तीचा समावेश आहे. यातील एकातही करोनाची लक्षणे आढळली नाहीत. हे सर्व जण आठवडाभराच्या कालावधीत ब्रिटनहून मायदेशी परतले आहेत. खबरदारी म्हणून या सर्वांना होम क्वारंटाइन राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

प्रवाशांची आरटीपीसीआर चाचणी

ब्रिटनहून भारतात दाखल झाल्यानंतर या प्रवाशांची विमानतळावर वैद्यकीय तपासणी करण्यात आलेली होती. मात्र, खबरदारी म्हणून जिल्हा प्रशासनाने त्यांची स्थानिक पातळीवर पुन्हा आरटीपीसीआर चाचणी करून घेतली आहे. त्यात सर्वांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. या सर्वांची संपर्क माहिती आरोग्य यंत्रणेने संकलित केली आहे. त्यांच्यावर पुढचे काही दिवस निगराणी ठेवली जाईल, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण यांनी दिली. यापुढेही ब्रिटन किंवा परदेशातून मायदेशी येणाऱ्या प्रवाशांची आरटीपीसीआर चाचणी केली जाणार आहे. या चाचणीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला तर त्याचे सॅम्पल ‘एनआयव्ही’कडे पाठवला जाणार आहे. यातून करोनाचा स्ट्रेन ओळखता येईल. जर रिपोर्ट निगेटिव्ह आला तरीही संबंधित प्रवाशाला होम क्वारंटाइन करण्याचे निर्देश दिले जातील, असेही डॉ. चव्हाण यांनी सांगितले.

महिला प्रवाशाने उडविली आरोग्य यंत्रणेची झोप

जिल्ह्यातील एरंडोल शहरातील माहेर असलेली एक महिला ब्रिटनमध्ये केंब्रिज येथे वास्तव्याला आहे. ही महिला मागील आठवड्यात तिच्या दोन मुलांसह आईला भेटण्यासाठी एरंडोल या ठिकाणी आली होती. आईला भेटल्यानंतर ती इंदूर येथे निघून गेली. या प्रकाराची माहिती मिळाल्यानंतर आरोग्य यंत्रणेची झोपच उडाली. आरोग्य यंत्रणेच्या वतीने तातडीने खबरदारी म्हणून संबंधित महिलेच्या कुटुंबीयांची करोना चाचणी करण्यात आली. त्यात सर्वांचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने आरोग्य यंत्रणेचा जीव भांड्यात पडला. त्यानंतर जळगावचे जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी भोपाळच्या जिल्हाधिकार्‍यांशी या विषयासंदर्भात फोनवरून चर्चा करत संबंधित महिलेची करोनाची चाचणी करावी, अशी विनंती केली. दरम्यान, त्या महिलेचा भाऊ डॉक्टर आहे. त्यांनी काही दिवस रुग्णसेवा बंद ठेवावी, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here