जळगाव जिल्ह्यातील धरणगाव तालुक्यातील एका गावातील महिलेला शुक्रवारी दुपारी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात प्रसूतीसाठी दाखल करण्यात आले होते. दुपारी ४ वाजता महिलेला प्रसूती कळा सुरू झाल्यानंतर स्त्रीरोग विभागप्रमुख डॉ. संजय बनसोडे आणि डॉक्टरांनी या महिलेची प्रसूती केली. जन्मलेल्या बाळाच्या शरीराची घडण अत्यंत दुर्मिळ असल्याचे डॉक्टरांच्या लक्षात आले. प्रसूतीपूर्वी या महिलेवर स्थानिक पातळीवर उपचारही सुरू होते. शिवाय वेळोवेळी सोनोग्राफीही करण्यात आली होती. मात्र, त्यात बाळाच्या शारीरिक व्यंगाविषयी काहीही समोर आले नव्हते. मात्र, बाळाचा जन्म झाल्यानंतर त्याच्या शरीराचा आकार एखाद्या माशाप्रमाणे असल्याचे दिसून आले.
या बाळाच्या पोटाखालील पूर्ण भाग म्हणजेच दोन्ही पाय हे एकमेकांना चिकटलेले होते. त्याच्या शरीराची रचना अगदी एखाद्या माशाच्या शरीररचनेसारखी होती. पोटाखाली संपूर्ण भागात व्यंग होते. शिवाय बाळाला किडनी नव्हती, या व्यंगाला वैद्यकीय भाषेत ‘सिरोनोमेलिया’ म्हटले जाते. अर्थात मत्स्यपरी अशा प्रकारची बालके ही अतिदुर्मिळ पद्धतीने जन्माला येत असतात आणि त्यांचे जीवनमान हे अगदीच काही तासांचे असते. परंतु, जळगाव जिल्हा रुग्णालयात जन्मलेले हे बाळ बारा तास जिवंत होते, अशी माहिती स्त्रीरोग विभागप्रमुख डॉ. संजय बनसोडे यांनी दिली.
वैद्यकीय तज्ञांच्या मते हा पर्यावरणीय व जनुकीय परिणाम असू शकतो. याबाबत ठोस पुरावे नसले तरी हा प्राथमिक अंदाज असू शकतो. बाळाची मातेच्या पोटात जडघडण होत असताना बाळाच्या धमन्यांना सुरळीत रक्तपुरवठा न झाल्याने अशा प्रकारचे व्यंग येण्याची शक्यता असते. आंबेजोगाई येथे असतानाही अशाच प्रकारे एका दुर्मिळ बाळाचा जन्म झाला होता.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times