ब्रिटनमध्ये करोना विषाणूच्या नवीन प्रकाराने चिंता वाढवली आहे. त्यामुळे देशातील यंत्रणा सतर्क झाली आहे. ब्रिटनहून आलेल्या प्रत्येक नागरिकाची आरटीपीसीआर करोना चाचणी करा असे आदेश शासनाने स्थानिक प्रशासनाला दिले आहेत. त्यानुसार महापालिकेने विमानतळावरुन माहिती घेतली आहे. २५ नोव्हेंबरपासून २४ डिसेंबरपर्यंत ४४ व्यक्ती ब्रिटनहून औरंगाबादेत आल्याचे या माहितीच्या आधारे स्पष्ट झाले आहे. त्यातील ३३ व्यक्ती औरंगाबाद शहरातील आहेत. ३३ पैकी शुक्रवारी ५७ वर्षीय एक महिला करोना पॉझिटिव्ह आढळून आली, तिच्यावर धूत हॉस्पिटलमध्ये उपचार केले जात आहेत. आज रविवारी २९ वर्षीय तरुण करोनाबाधित असल्याचे स्पष्ट झाले. तो आरेफ कॉलनी येथील रहिवासी असून १५ डिसेंबर रोजी तो ब्रिटनहून औरंगाबादेत आल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. नीता पाडळकर यांनी दिली. त्या तरुणाची काल आरटीपीसीआर चाचणी करण्यात आली होती, त्यात तो पॉझिटिव्ह असल्याचे स्पष्ट झाले.
पाच नागिरकांचा ठावठिकाणा लागेना
ब्रिटनहून आलेल्या तेरा नागरिकांचा महापालिकेला ठावठिकाणा लागत नव्हता, त्यामुळे त्या नागरिकांची नावे त्यांच्या पासपोर्ट क्रमांकासह महापालिकेने पोलिसांकडे दिली होती. पोलीस आपल्याला शोधून काढतील या भीतीने १३ पैकी आठ जणांनी स्वत:हून पुढे येत, करोना चाचणी करून घेतली, पाच जणांचा मात्र शोध अद्याप लागलेला नाही.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times