मुंबई: ‘दिल तो हैपी है जी’ या मालिकेतील भूमिकेमुळे प्रकाशझोतात आलेली प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री सेजल शर्माने मिरा रोड येथील राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याने सिनेसृष्टीत हळहळ व्यक्त होत आहे. काम मिळत नसल्याने आलेल्या नैराश्येतून तिने आत्महत्या केल्याचे सुसाइड नोटमधून स्पष्ट झाले आहे.

मिरा रोडमधील शिवार गार्डन भागात रॉयल नेस्ट इमारतीत आपल्या मैत्रिणीसह राहत होती. याच फ्लॅटमध्ये आज पहाटे चार वाजताच्या सुमारास तिने गळफास घेऊन आत्महत्या केली. सेजल ही मूळची राजस्थानमधील उदयपूर येथील असून शवविच्छेदनानंतर तिचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आहे. अंत्यसंस्कारासाठी तिचे पार्थिव उदयपूर येथे नेण्यात आले आहे.

‘स्टार प्लस’वरील ‘दिल तो हैपी है जी’ या मालिकेत सेजल मध्यवर्ती भूमिका साकारत होती. १४८ भागांनंतर ही मालिका ९ ऑगस्ट २०१९ रोजी बंद झाली. त्यानंतर सेजल अन्यत्र काम शोधत होती. मात्र, काम मिळू न शकल्याने तिला नैराश्य आले होते. ‘गेल्या दीड महिन्यापासून मी नैराश्येत असून त्यामुळेच मी आत्महत्या करत आहे. माझ्या मृत्यूसाठी कोणालाही जबाबदार धरू नये’ अशी सुसाइड नोट सेजलने लिहून ठेवली असून त्याआधारे मिरा रोड पोलीस पुढील तपास करत आहेत.

दरम्यान, ‘दिल तो हैपी है जी’ या मालिकेत सेजलच्या भावाची भूमिका साकारणाऱ्या अरु के वर्माने यावर तीव्र शोक व्यक्त केला. ही बातमी माझ्यासाठी धक्कादायक आहे. दहा दिवसांपूर्वीच मी सेजलला भेटलो होतो. तेव्हा ती तणावात वगैरे असल्याचे जाणवले नाही. रविवारनंतर मात्र तिच्याशी माझा संपर्क नाही. व्हॉट्सअॅपवरही काही चॅट झाले नाही, असे वर्माने सांगितले. सेजल मला बहिणीसमान होती. तिने मला राखी बांधली होती. तिच्या जाण्याने मी पुरता हादरलो आहे, अशा शब्दांत अरु के वर्माने शोक व्यक्त केला.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here