मुंबई: ‘राजकारणात दोन द्यावे आणि दोन घ्यावे लागतात. सत्ताधारी भाजपची ताकद मोठी असल्याने त्यांनी चार द्यावेत. पण कधीतरी दोन घेण्याची तयारीही ठेवायला हवी. विरोधी बाकांवर आज मधु लिमये, मधु दंडवते, लोहिया, जनेश्वर मिश्र, चंद्रशेखर, लालू यादव नाहीत, हे मोदी सरकारचे भाग्य आहे. नाहीतर टोले आणि टोमणे म्हणजे काय याचा प्रत्यय आला असता,’ असा खोचक व सूचक इशारा शिवसेनेनं दिला आहे. ‘राज्य मिळालं आहे ते नीट चालवा. शेळ्यांवर राज्य करणं सोपं असतं,’ असंही शिवसेनेनं सुनावलं आहे. (Shivsena criticises Modi Government)

वाचा:

शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी अलीकडेच पंतप्रधान यांच्यावर टीका केली होती. त्यानंतर बोलताना, दिल्लीतील काही लोक मला सतत टोमणे मारतात व माझा अपमान करतात. त्यांना लोकशाहीचे धडे द्यायचे आहेत, असं मोदी म्हणाले होते. शिवसेनेनं ‘सामना’च्या अग्रलेखातून मोदींच्या या इशाऱ्याचा समाचार घेतला आहे. ‘आपल्या पंतप्रधानांचा अपमान कोण करतंय? पंतप्रधानांचा अपमान करण्याइतका प्रबळ विरोधी पक्ष विद्यमान राज्यकर्त्यांनी शिल्लक ठेवला आहे काय?,’ असा प्रश्न शिवसेनेनं उपस्थित केलाय. ‘काँग्रेसच्या सध्याच्या नेतृत्वास आपण गांभीर्याने घेत नसल्याचे भाजप पुढाऱ्यांनी एका बाजूला सांगायचे व त्याचवेळी राहुल गांधी आमचा अपमान करतात, असे दुसऱ्या तोंडाने बोलायचे हे पांचट विनोदाचे लक्षण आहे. विधायक टीका करणे, सरकारच्या खोटेपणावर बोलणे यास राज्यकर्ते अपमान म्हणत असतील तर लोकशाहीचा अंतकाळ जवळ आला आहे,’ अशी टीकाही शिवसेनेनं केली आहे.

अग्रलेखातील ठळक मुद्दे:

>> दिल्लीतल्या टोमणेबाजांना लोकशाही शिकवायची आहे, असं सांगताना मोदी जम्मू-काश्मीरचे उदाहरण देतात. तिथं जिल्हा विकास परिषदेच्या निवडणुका पार पाडल्या, हे लोकशाहीचे उदाहरण असल्याचा दावा करतात, पण तेच मोदी सरकार दिल्लीच्या सीमेवरील आंदोलक शेतकऱ्यांना दहशतवादी ठरवून त्यांच्याशी चर्चा करायला तयार नाही.

>> सरकारविरोधात कोणी बोलत असतील म्हणून त्यांची गळचेपी करणे किंवा अशा लोकांशी संवाद तोडणे म्हणजे लोकशाही नव्हे. पण सरकार किंवा राजा करतो, ते सर्व बरोबर या भूमिकेत आजचे सरकार आहे. सध्याच्या राजवटीत लोकांच्या शेळ्या झाल्या आहेत. सरकारला शेळ्यांची व्यवस्था करायची आहे व त्या व्यवस्थेवर शेळ्या खूश असतील तर तो त्यांचा प्रश्न, पण इतरांनीही शेळ्या-मेंढ्या व्हावं हा त्यांचा आग्रह चुकीचा आहे.

>> वाघ, लांडगे, हत्ती, सिंह यांनीही शेळ्या-मेंढ्यांसारखे बॅss बॅss करावे व कोणी गर्जना केली तर तो अपमान, ही लोकशाही नाही. यालाच लोकशाही म्हणावे, असा दबाव टाकणाऱ्यांना लोकशाही शिकवायची गरज आहे. पंतप्रधान जम्मू-काश्मीरातील जिल्हा विकास परिषद निवडणुकांवर बोलतात, पण लडाखमध्ये घुसलेल्या चिनी सैन्यावर बोलत नाहीत. तो विषय काढला की, त्यांना तो अपमान किंवा टोमणे वाटतात.

वाचा:

>> पंतप्रधान मोदी व गृहमंत्री शहा यांना कोण कशाला टोमणे मारतील? त्यांच्याकडे बहुमत आहे. त्यांचे राज्य बहुमतावर सुरू आहे. सीबीआय, ईडी, आयकर विभाग हे त्यांच्या बहुमताचे रखवालदार आहेत, तोपर्यंत चिंता करण्याचे कारण नाही. त्यामुळे टोमणे वगैरेची चिंता का करता?

>> मोदी हे जागतिक स्तरावरील मोठे नेते आहेत. त्यामुळे राहुल गांधी यांनी मारलेल्या टोमण्यांची दखल घेण्याची त्यांना गरज नाही. राहुल गांधी यांना गेल्या सहा वर्षांत या मंडळींनी मारलेले टोमणे एकत्र केले तर मोठे ग्रंथ निर्माण होतील. राहुल गांधींचा उल्लेख ‘पप्पू’ असा करणाऱ्यांनी दुसऱ्यांनी मारलेल्या टोमण्यांची धास्ती का बाळगावी?

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here