‘तू चाल पुढं, तुला रं गड्या भीती कशाची’, हे जुने मराठी गाणे यावर्षात करोना संकटकाळात अनेकांनी प्रत्यक्षात आणून दाखवले. काळाने झडप टाकावी तसे लॉकडाउन आले आणि हजारोंचा रोजगार गेला. पण, याही स्थितीत रडत न बसता अनेकांनी वेगळा व्यवसाय सुरू केला. हिमतीने नव्या क्षेत्रात उभे राहण्याचे कसब दाखविण्याचे काम काही शिलेदारांनी केले असून, ते सरत्या वर्षात अधोरेखीत ठरते.

वर्षाच्या सुरुवातीलाच करोनाचं संकट आलं. त्यातच लॉकडाऊन लागू झाला. लॉकडाऊनच्या या काळात अनेकांना नोकरी गमवावी लागली, अनेकांचा रोजगार गेला. मात्र, मुंबईतील या तरुणांनी या संकटकाळातही सुवर्णसंधी शोधली आहे. रोजगार ठप्प झाल्यानं खचून न जाता नव्यानं भरारी देत स्वतःचा व्यवसाय सुरु केला आहे. आपल्या आवडीचा छंद जोपासत त्यांनी जोमानं नव्या व्यवसायाची सुरुवात करत उद्योग क्षेत्रात पाऊल ठेवलं आहे. या तरुणांनी सुरु केलेल्या व्यवसायाचा घेतलेला हा आढावा…

लॉकडाऊनच्या संकटात 'या' मराठी तरुणांनी शोधली संधी

‘तू चाल पुढं, तुला रं गड्या भीती कशाची’, हे जुने मराठी गाणे यावर्षात करोना संकटकाळात अनेकांनी प्रत्यक्षात आणून दाखवले. काळाने झडप टाकावी तसे लॉकडाउन आले आणि हजारोंचा रोजगार गेला. पण, याही स्थितीत रडत न बसता अनेकांनी वेगळा व्यवसाय सुरू केला. हिमतीने नव्या क्षेत्रात उभे राहण्याचे कसब दाखविण्याचे काम काही शिलेदारांनी केले असून, ते सरत्या वर्षात अधोरेखीत ठरते.

पाककौशल्याला कॅफेचा साज
पाककौशल्याला कॅफेचा साज

प्रभादेवीत राहणारा विनीत देव. निवदेक म्हणून असलेले काम गेल्यानंतर हताश न होता स्वत:मधील पाककौशल्याच्या जोरावर कॅफे सुरू करण्याची हिंमत विनीतने दाखवली.

विनीत अनेक वर्षांपासून मनोरंजन क्षेत्राशी निगडित आहे. विविध कार्यक्रमांमध्ये तो निवेदनाचे काम करायचा. पण, लॉकडाउन लागले आणि निवदेन क्षेत्र जागेवरच थांबले, विनीतचे हातचे काम गेले. पण त्या स्थितीत डगमगून न जाता त्याने स्वत:मधील पाककौशल्याला वाव दिला व आज कॅफे क्षेत्रात तो जोमाने उभा आहे.

हातातले काम गेल्यावर सुरुवातीला विनीतने घर चालविण्यासाठी म्हणून घरीच कॅफे सुरू केला. त्याच्या परिसरात राहणाऱ्यांना तसेच बाहेरील लोकांना ऑर्डरनुसार पदार्थ तयार करून देण्यास सुरुवात केली. हे पदार्थ लोकांना आवडू लागले. चांगल्या प्रतिक्रिया येऊ लागल्याने विनीतचा हुरूप वाढला. यामुळे त्याने पाककलेचा अभ्यास केला. त्यात अनेक नवनवीन पदार्थ तो शिकला. आता हे नवीन पदार्थ लोकांना आवडू लागले आहेत. यामुळे ते आता चांगलेच लोकप्रियदेखील ठरत आहेत. यामुळेच विनीतचा उत्साह दुणावला आहे. करोना संकटातील संधीचे एक दमदार सोने त्याने करून दाखवले आहे.

ओळखली काळाची हाक
ओळखली काळाची हाक

रोहन सलून क्षेत्रात कुशल होता. पण, लॉकडाउन लागले अन्‌ कात्री चालवणारे हात थांबले. मात्र, परिस्थितीसमोर न डगमगता रोहन भाटकरने काळाची हाक ओळखली व डिजिटल कन्सलटंट म्हणून त्याने कुशलरित्या काम सुरू केले.

रोहन भाटकर हा मूळ सलून व स्पा क्षेत्रात कुशल आहे. पण करोना लॉकडाउन लागल्याने संसर्गाच्या भीतीने सलून व्यवसाय बंद पडला. अचानक काम गेल्याने काय करावे हे रोहनला सुचत नव्हते. पण, सर्वच क्षेत्रात झपाट्याने होत असलेली डिजिटल हाक त्याने ऐकली व स्वत:चे क्षेत्र बदलून डिजिटल विश्वात उडी घेतली. त्या माध्यमातून सर्वसामान्यांची सेवादेखील सुरू केली.

लॉकडाउन काळात जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा होता. पण, अशा गरजूंना मदत करण्यासाठी अनेक कंपन्यांही सरसावल्या होत्या. अशा कंपन्यांच्या कामाचे डिजिटल पद्धतीने नियोजन करण्याचे काम रोहनने सुरू केले. घरातूनन त्याने हे काम सुरू केले. याच काळात काही राजकीय नेतेदेखील मैदानात उतरून गरजूंना मदत करीत होते. या कामाचे नियोजन करणे, ते डिजिटल व सामाजिक माध्यमांद्वारे लोकांपर्यंत पोहोचविणे, हे काम रोहनने केले. हेच काम आणखी पुढे नेत तो वेगवेगळ्या कंपन्यांसाठी कन्सलटंट म्हणून काम करीत आहे. त्यातून उत्पन्न तर मिळतेच शिवाय सेवादेखील होते. एकूणच काम गेले म्हणून हताश न होता नवीन काम शिकून त्यात रोहनने स्वत:चा जम बसवला आहे.

शिक्षिका ते पर्यवेक्षिका
शिक्षिका ते पर्यवेक्षिका

लॉकडाउनच्या सुरुवातीच्या टप्प्यात शिक्षण पूर्णपणे थांबले. पण त्यातून हताश न होता शिक्षक म्हणून असलेल्या अनुभवाचा फायदा हितेश्री शिंदे आता पर्यवेक्षिकेच्या कामासाठी करीत आहेत.

हितेश्री शिंदे ही हॉटेल व्यवस्थापनात कुशल आहेत. हॉटेल व्यवस्थापनाच्याच विद्यार्थ्यांना ती शिकवत होती. पण करोना लॉकडाउन लागले व सर्व प्रकारचे शिक्षण थांबले. आता मागील काही महिन्यांत ऑनलाइन शिक्षण सुरू असले, तरी लॉकडाउनच्या सुरुवातीला सर्व प्रकारचे शिक्षण थांबले होते. त्यामुळे हितेश्रीची नोकरीही धोक्यात आली. अशा स्थितीत करायचे काय, असा प्रश्न समोर होता. पण हॉटेल व्यवस्थापन शिकवण्याचा अनुभव असल्याने तेच काम तिने प्रत्यक्ष करण्याचा निर्णय घेतला.

हितेश्री सध्या हॉटेलमध्ये पर्यवेक्षणाचे काम करते. एरव्ही हेच हॉटेल व्यवस्थापनाचे धडे ती विद्यार्थ्यांना देत होती. आज त्या अनुभवाच्या आधारे ती स्वत: पर्यवेक्षकाचे काम करते. त्याचवेळी स्वत: हॉटेल व्यवस्थापनात कुशल असल्याने पाककलादेखील येतेच. त्याआधारे हितेश्री आता ऑनलाइन केक तयार करण्याचे धडे देते. स्वत: केकच्या ऑर्डरही घेते. अशाप्रकारे हितेश्रीने संकटातून संधी शोधून त्याचा योग्य उपयोग केला.

ग्राहकांना डेली नीड्सचा ‘प्रसाद’
ग्राहकांना डेली नीड्सचा ‘प्रसाद’

पर्यटन व्यवसाय आणि डेली नीड्स यांचा अर्थाअर्थी कुठलाही संबंध नाही. पण प्रसाद पल्लीवाल यांनी स्वत:चे क्षेत्र बदलत डेली नीड्सचे दुकान सुरू केले. केवळ सुरू केले नाही, तर ते यशस्वीरित्या चालवून दाखवले आहे.

प्रसाद पल्लीवाल यांचा पर्यटनाचा व्यवसाय होता. मुंबईतील अनेक पर्यटकांना राज्यातील पर्यटनस्थळे, देश फिरवून आणले. पण पर्यटन मोसमाच्या अगदी तोंडावर लागलेल्या करोना लॉकडाउनने ‘न भुतो न भविष्यती’ असे संकट उभे केले. नियोजित सर्व सहली रद्द झाल्या. पर्यटन पूर्ववत होऊन नवीन सहली कधी सुरू होणार, याची शाश्वतीदेखील नव्हती. त्यामुळे एरव्ही इतरांना सहली घडविणाऱ्या प्रसाद यांना स्वत:लाच घरी बसावे लागले. आता करायचे काय? असा प्रश्न पडला. पण डगमगून न जात स्वत:चा व्यवसायच त्यांनी बदलला.

प्रसाद हे पर्यटन व्यवसाय चालवत असल्याने त्यांचे स्वत:चे एक दुकान आहेच. त्या दुकानात आता पर्यटक बुकिंगसाठी येत नसले, तरी त्यांनी अन्य ग्राहकांना खेचून आणले. त्याची सुरुवात केली ती केक व चॉकलेटच्या साहाय्याने. या दोन वस्तूंची विक्री करून त्यांचे अर्थाजन सुरू झाले. बघता-बघता मागील सहा महिन्यांत हा व्यवसाय खूप वाढला. आज ३७० हून अधिक उत्पादनांची प्रसाद पल्लीवाल हे विक्री करीत आहेत.

​भाजीविक्रीद्वारे हुशारीची ‘चेतना’​
​भाजीविक्रीद्वारे हुशारीची ‘चेतना’​

हाती असलेली माझगाव डॉकची नोकरी गेली. चिंतेचे ढग दाटले तरी थांबून न राहता चेतन पाटील याने भावासह ऑनलाइन भाजी विक्रीचा व्यवसाय सुरू केला. आज दररोज ३०० किलो भाजीची विक्री तो करतो.

चेतन पाटीलने आयटीआय केले आहे. माझगाव डॉकमध्ये त्याची नोकरी होती. नोकरी कंत्राटावर असल्याने लॉकडाउन लागताच चेतनचे कंत्राट थांबले. कुटुंबावर अचानक आभाळ कोसळले. त्यामुळे काय करावे, असा प्रश्न त्याच्यासमोर उभा ठाकला होता. डोक्यात तांत्रिक हुशारी होतीच. त्याचा योग्य उपयोग करीत चेतनने ऑनलाइन भाजी व्यवसाय सुरू केला.

करोना लॉकडाउन काळात फक्त भाजीपाला, दूध व धान्याचाच व्यवसाय होत होता. त्यामुळे भाजी विक्रीचा निर्णय घेतला. ओळखीतला एक जण आधी भाजीचे लहानसे दुकान चालवत होता. त्याच्याकडून भाजी विक्रीची माहिती घेतली. सुरुवातीला अनेक ग्राहकांच्या मनात विश्वास निर्माण होण्यासाठी खूप वेळ लागला. पण प्रत्येकाशी संपर्क साधून विश्वास दिला. आता हेच काम चेतन भावासह जोमाने करीत आहे.

चेतनने त्याच्या भावासह अनेकांशी संपर्क साधला. मेहनत केली. आता त्यांच्याकडे ५० नियमित ग्राहक आहेत. त्यांना ते भाजीपाला धुवून, कापून व निर्जंतूक करून विक्री करतात. रोजची किमान २५० ते ३०० किलो भाजीची उलाढाल आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here