कोरेगाव भीमा प्रकरणानंतर तेव्हाच्या भाजप सरकारने काही दलित कार्यकर्ते व विरोधी पक्षनेत्यांचे फोन व व्हॉट्सअॅप मेसेज टॅप केल्याप्रकरणी महाराष्ट्राच्या गृहमंत्रालयाने चौकशीच्या हालचाली सुरू केल्या असतानाच कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणाचा तपास एनआयएने आपल्याकडे घेतल्याने या दोन गोष्टींची काही लिंक आहे का?, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
महाविकास आघाडी सरकारने कोरेगाव भीमा प्रकरणी झालेल्या कारवाईची फेरचौकशी सुरू केली असतानाच अचानक राष्ट्रीय तपास संस्थेने संबंधित प्रकरणाचा तपास स्वत:कडे घेतल्याने यामागे भाजपचे षडयंत्र असल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. एनआयएच्या तपासाच्या कक्षेत हे प्रकरण येते हे कळायला दोन वर्षे का लागली?, हा प्रश्न येथे उपस्थित होत असून याचा काँग्रेस पक्ष निषेध करत आहे, अशा शब्दांत काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते सचिन सावंत यांनी पक्षाची भूमिका ट्विटरच्या माध्यमातून मांडली आहे.
पवारांनी केली होती SIT चौकशीची मागणी
कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणी एसआयटी स्थापन करून त्यामार्फत चौकशी करण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. पवार यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या दोन पानी पत्रात तत्कालीन देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. कोरेगाव भीमाच्या बाबतीत फडणवीस सरकारने सत्तेचा गैरवापर केला. माध्यमांनाही चुकीची माहिती दिली. पोलिसांना हाताशी धरून घडविलेले ते एक षडयंत्र होते. मुख्य सूत्रधारांना पाठीशी घालून जनतेची दिशाभूल करण्याचाच सगळा डाव होता. पोलिसांनी या प्रकरणात बहुतेक पुरावे तोडून-मोडून सादर केले, असा गंभीर आरोप पवारांनी या पत्रात केला आहे. एकीकडे याप्रकरणी शरद पवार यांनी एसआयटी चौकशीची मागणी केली असताना हा तपास केंद्र सरकारने एनआयएकडे दिल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times