वृत्तसंस्था, नवी दिल्ली

देशाची तिजोरी भरण्याचे प्रमुख साधन असलेल्या प्रत्यक्ष करांच्या वसुलीला गेल्या २० वर्षांमध्ये यंदा प्रथमच झटका बसला आहे. विद्यमान वर्षामध्ये कॉर्पोरेट कर आणि प्राप्तिकराच्या वसुलीत मोठ्या प्रमाणत घट झाली आहे. ‘रॉयटर्स’ने दिलेल्या वृत्तानुसार प्रत्यक्ष करांमध्ये झालेली घट प्रामुख्याने आर्थिक मंदी आणि कॉर्पोरेट करांमध्ये करण्यात आलेल्या कपातीमुळे झाली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चालू आर्थिक वर्षात प्रत्यक्ष करांमधून मिळणाऱ्या उत्पन्नाचे लक्ष्य १३.५ लाख कोटी रुपये इतके निर्धारित केले होते. हे लक्ष्य मागील आर्थिक वर्षाच्या तुलनेत १७ टक्क्यांनी अधिक आहे. अर्थविश्लेषकांनी दिलेल्या माहितीनुसार गेल्या काही वर्षांपासून बाजारांमध्ये मागणी घटत असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे कंपन्यांनी गुंतवणूक आणि नोकऱ्यांचे प्रमाण घटवले आहे. त्यामुळे प्रत्यक्ष करांच्या वसुलीत घट दिसून आली आहे. केंद्र सरकार आणि अन्य वित्तसंस्थांनी देशाचा विकास दर पाच टक्क्यांवर राहण्याचा अंदाज वर्तवला आहे. हा गेल्या अकरा वर्षांतील नीचांकी दर आहे.

गेल्या वर्षीच्या तुलनेत घट
प्राप्तिकर विभागाने दिलेल्या माहितीसमोर जानेवारीपर्यंत ७.३ लाख कोटी रुपये गोळा करण्यात यश आले असून, गेल्या वर्षीच्या तुलनेत ही रक्कम जवळपास साडेपाच टक्क्यांनी कमी आहे. गेल्या तीन वर्षांतील आकड्यांचा आढावा घेतला असता पहिल्या तीन तिमाहींमध्ये कंपन्यांकडून अग्रिम कर (अॅडव्हान्स्ड टॅक्स) वसूल केला जातो. त्यानंतर शेवटच्या तीन महिन्यांमध्ये प्रत्यक्ष कराची वसुली जवळपास ३० ते ३५ टक्के इतकीच असते.

१० टक्क्यांनी होणार घट?
प्राप्तिकर विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी नाव प्रसिद्ध न करण्याच्या अटीवर दिलेल्या माहितीनुसार चालू आर्थिक वर्षात प्रत्यक्ष करांची वसुली ११.५ लाख कोटी रुपयांपेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे. आर्थिक वर्ष २०१८-१९मध्ये प्रत्यक्ष करांच्या माध्यमातून ११.५ लाख कोटी रुपयांची देशाच्या तिजोरीत भर पडली होती. त्यात यंदा १७ टक्क्यांची वाढ होईल, अशी आशा सरकारला होती. त्यानुसार सरकारने वसुलीचे उद्दिष्ट निर्धारिते केले होते. मात्र, २० वर्षांत प्रथमच सरकारला प्रत्यक्ष करांतून मिळणारे उत्पन्न घटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ‘करवसुलीचे उद्दिष्ट विसरूनच जा; पण यंदा प्रथमच प्रत्यक्ष करांच्या वसुलीतच घट होण्याची शक्यता आहे,’ असेही या अधिकाऱ्याने सांगितले. त्यांच्या मते चालू आर्थिक वर्षात प्रत्यक्ष करांचे उद्दिष्ट मागील आर्थिक वर्षाच्या तुलनेत १० टक्क्यांनी घटण्याची शक्यता आहे.

~ १३.५ लाख कोटी
चालू वर्षातील करवसुलीचे उद्दिष्ट

~ ११.५ लाख कोटी
गेल्या वर्षातील करवसुलीचे उद्दिष्ट

~ ७.३ कोटी
जानेवारी २०१९पर्यंत जमा कर

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here