म. टा. प्रतिनिधी, मुंबई

मुंबई महापालिकेच्या आगामी निवडणुकीत पक्षाची संपूर्ण ताकद पणाला लावून मुंबईवर काँग्रेसचा तिरंगा झेंडा फडकावण्याचा निर्धार काँग्रेस नेत्यांनी सोमवारी मुंबईत केला. तर, स्वबळावर लढण्याची इच्छा सर्व कार्यकर्त्यांची असून, विरोधकांसाठी जिथे आवश्यक आहे, तिथे एक घाव दोन तुकडे करून जोरदार झटका देणार आहे. भाजपने निवडणुकीनंतर मुंबई महापालिकेतील ८२ जागा वाचवून दाखवाव्यात, असे आपले भाजपला आव्हान असल्याचे मुंबई विभागीय काँग्रेसचे नूतन अध्यक्ष यांनी स्पष्ट केले.

काँग्रेस पक्षाच्या स्थापना दिनानिमित्त मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप आणि कार्याध्यक्ष चरणसिंग सप्रा यांनी आपल्या पदाची सूत्रे हाती घेतली. त्यासाठी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. यूपीएच्या नेतृत्वाबाबत बाहेरच्या पक्षांनी सल्ला देता कामा नये. सोनिया गांधी याच आमच्या अध्यक्षा व नेत्या आहेत आणि कायम त्याच राहणार आहेत. आमच्या नेत्यांबद्दल काहीही बोललेले आम्ही सहन करणार नाही, असे काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी एच. के. पाटील यांनी यावेळी आवर्जून सांगितले.

याप्रसंगी प्रभारी एच. के. पाटील यांच्यासह काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण, माणिकराव ठाकरे, मुंबईचे मावळते अध्यक्ष एकनाथ गायकवाड, पालकमंत्री अस्लम शेख, शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड, माजी मंत्री नसीम खान, सुरेश शेट्टी, चंद्रकांत हंडोरे, अमरजितसिंह मनहास, जनार्दन चांदुरकर, भालचंद्र मुणगेकर, आ. अमीन पटेल, झिशान सिद्दीकी, बाबा सिद्दीकी, मनपा विरोधी पक्ष नेते रविराजा आदी उपस्थित होते.

‘आज कार्यकर्त्यांचा जोश आणि ऊर्जा बघून मला खात्री आहे की येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीत आपण भरघोस यश मिळवू. संपूर्ण २२७ जागांवर लढायचे की नाही त्यावर आपण चर्चा करून ठरवू. पण काँग्रेसचा महापौर किंवा आपल्याशिवाय सत्ता नाही या परिस्थितीसाठी सगळ्यांनी आतापासूनच जोमाने कामाला लागा’, असे एच. के. पाटील म्हणाले. ‘मुंबईतील सामान्य व गरीब जनतेच्या अनेक समस्या आहेत. त्या सोडविण्यासाठी आपल्या काँग्रेसच्या १२ मंत्र्यांनी महिन्यातून एक दिवस जनता दरबारासाठी मला द्यावा’, अशी मागणी भाई जगताप यांनी केली.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here