वाचा:
२००९ च्या लोकसभा निवडणुकीत आठवले यांचा शिर्डी मतदारसंघातून पराभव झाला होता. शिवसेनेच्या भाऊसाहेब वाघचौरे यांना ३ लाख ५९ हजार ९२१ मते मिळाली होती. तर रामदास आठवले यांना २ लाख २७ हजार १७० मते मिळाली होती. या पराभवाला त्यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीसोबतच विखे पाटलांनाही जबाबदार धरले होते. राखीव झाल्याने त्या भागातून निवडणूक लढविणाऱ्या बाळासाहेब विखे पाटील यांना नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी हवी होती. त्यासाठी ते प्रयत्न करीत होते. त्यांना तेथून उमेदवारी मिळाली तर ते शिर्डीतून आठवले यांना निवडून आणण्याची जबाबदारी घेत होते. मात्र, राष्ट्रवादीच्या ताठर भूमिकेमुळे विखेंना उमेदवारी मिळाली नाही. त्यामुळे आठवले यांचा शिर्डीतून पराभव झाला. आठवले यांनी ही गोष्ट खूपच मनाला लावून घेतली होती. नगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आल्यावर दरवेळी ते या विषयावर भाष्य करीत. दोन्ही काँग्रेस आणि विखेंवर टीका करीत होते. नंतर ते भाजपसोबत गेले. २०१४ मध्ये ते राज्यसभेवर गेले व केंद्रीय मंत्री झाले. मात्र त्यांना शिर्डीतील पराभवाची सल कायम असून या पराभवाचे उट्टे काढायचे त्यांच्या मनातून गेलेले नाही. २०१९ च्या निवडणुकीपूर्वीही त्यांनी शिर्डीत येऊन लढण्याची तयारी केली होती. त्यासाठी शिर्डीत पक्षाचा वर्धापनदिन साजरा करून निवडणूक तयारीची पायाभरणी केली होती. यानिमित्ताने शिर्डीत आल्यावर त्यांनी पुन्हा एकदा दोन्ही काँग्रेस आणि विखेंच्या भूमिकेवर टीका केली होती. त्यावेळी झालेल्या अॅट्रोसिटीच्या अपप्रचाराचा फटकाही आपल्याला बसल्याचे आठवले सांगतात.
वाचा:
या पार्श्वभूमीवर सोमवारी शिर्डीत आलेल्या आठवलेंच्या मनात त्या पराभवाचे शल्य कायम असल्याचे आढळून आले. त्यांनी यावर भाष्य केलेच. मात्र यावेळी त्यांनी विखे पाटलांबद्दलचे भाष्य सावरून घेतले. ते म्हणाले, ‘२००९ च्या निवडणुकीत त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसने माजी खासदार बाळासाहेब विखे पाटील यांच्यासाठी नगर दक्षिणची जागा सोडली असती तर शिर्डी मतदारसंघात माझा पराभव झालाच नसता. आपण ती निवडणूक चार ते पाच लाखांच्या फरकाने जिंकलो असतो. त्यावेळी झालेला अॅट्रोसिटीचा अपप्रचारही परभावाचे कारण ठरला. आता मात्र परिस्थिती बदलली आहे. विखे पाटील यांचे नातू डॉ. सुजय विखे पाटील नगर दक्षिण मतदारसंघातून भाजपचे खासदार आहेत. त्यामुळे आता मला पुन्हा शिर्डीत येण्यासाठी काहीही अडचण नाही,’ असे सांगत आठवले यांनी आपली शिर्डीतून निवडणूक लढविण्याची सुप्त इच्छा पुन्हा एकदा व्यक्त करून दाखविली आहे. अर्थात त्यावेळीही त्यांना विखे यांच्या मदतीनेच खासदार व्हायचे होते आणि आताही विखे यांच्याच मदतीची अपेक्षा ठेवून आहेत. अर्थात यावेळी दोघांचीही राजकीय पार्श्वभूमी बदललेली आहे.
वाचा:
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times