मुंबईः ब्रिटन आणि इतर देशांमध्ये करोना विषाणूचा नवीन प्रकार आढळून आला आहे. या दुसऱ्या प्रकारच्या करोना विषाणूचा प्रसार अतिशय वेगानं होत असल्याचं स्पष्ट झालं आहे. नवा करोना विषाणूचा धोका लक्षात घेऊन सर्व प्रशासकिय यंत्रणांही सावध झाल्या असून गेल्या महिनाभरात ब्रिटनहून मुंबईत परतलेल्या प्रावशांच्या चाचण्या घेण्यात येत आहेत. या चाचण्यांमध्ये आज ब्रिटनमधून मुंबईत आलेले १२ प्रवासी पॉझिटिव्ह आढळले आहेत.

ब्रिटनहून येणाऱ्या सर्व विमानांवर सरकारकडून बंदी घालण्यात आली आहे. तर, गेल्या महिन्याभरात जितके प्रवासी मुंबईत आले आहेत त्यांचा कसून शोध घेतला जात असून त्यांची करोनाची चाचणी करण्यात येत आहे. यामध्ये काही रुग्ण पॉझिटिव्ह आढळले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत, अशी माहिती पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकणी यांनी दिली आहे.

‘२५ नोव्हेंबर पासून ते आजच्या तारखेपर्यंत जे प्रवासी मुंबईत आले आहेत त्यांच्या चाचण्या करण्यात येत आहेत. २१ ते २३ डिसेंबर दरम्यान मुंबईत दाखल झालेल्या प्रवाशांना हॉटेलमध्येच क्वारंटाइन करण्यात येत आहेत. या पूर्ण रुग्णांमध्ये १२ जणं करोना पॉझिटिव्ह सापडले आहेत,’ असं सुरेश काकाणी यांनी स्पष्ट केलं आहे.

‘पॉझिटिव्ह आलेल्या १२ रुग्णांच्या अहवालांचे नमुने पुण्यातील लॅबमध्ये तपासणीसाठी पाठवले आहेत. त्या लॅबच्या अहवालानंतरच त्या रुग्णांना करोनाच्या नव्या स्ट्रेनची लागण झाली आहे का हे स्पष्ट होणार आहे,’ असंही त्यांनी नमूद केलं आहे.

दरम्यान, ३१ डिसेंबर व नववर्षाच्या पार्श्वभूमीवर करोनाचा धोका अधिक पसरु नये म्हणूनही काकाणी यांनी नागरिकांना अवाहन केलं आहे. ‘सार्वजनिक ठिकाणी व चौपाट्यांवर महापालिका आणि मुंबई पोलिसांचे पथक तैनात असतील. नागरिकांनी सुरक्षित अंतर राखणे, मास्क लावणे, असे नियम पाळणं बंधनकारक असणार आहेत,’ अशी माहिती त्यांनी दिली आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here