संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना ईडीनं नोटीस बजावल्यानंतर आज वर्षा राऊत यांना आज चौकशीसाठी बोलावण्यात आलं होतं. मात्र, राऊत यांनी वेळ मागून घेतली आहे. त्यामुळं लवकरच त्यांना चौकशीला सामोरं जावं लागणार आहे. म्हणूनच कायदेशीर सल्ला घेण्यासाठी अनिल परब आणि संजय राऊत यांच्यात भेट झाली असल्याचं बोललं जात आहे. अनिल परब हे वकिल असल्यानं ईडी चौकशी दरम्यान नेमकं काय घडू शकतं? यावर दोन्ही नेत्यांमध्ये बराचवेळ चर्चा झाली असल्याचंही सांगण्यात येत आहे.
दरम्यान, अनिल परब यांनी मात्र या वृत्ताचं खंडन करत ईडी प्रकरणाबद्दल काहीच चर्चा झाली नसल्याचं म्हटलं आहे. संजय राऊतांना दुसऱ्या महत्त्वाच्या कामासाठी भेटण्यासाठी सामना कार्यालयात गेलो होतो, असं त्यांनी स्पष्ट केली आहे. तसंच, पक्ष म्हणून या संदर्भात लवकरच भूमिका जाहीर करु, असंही ते म्हणाले आहेत.
संजय राऊत काय म्हणाले?
ईडीसमोर हजर राहण्यास वर्षा राऊत यांनी ५ जानेवारीपर्यंत वेळ मागितला होता. तसं पत्रही त्यांनी ईडीसमोर सादर केलं आहे. संजय राऊत यांनीही या वृत्ताला दुजोरा देत ईडीकडे आम्ही वेळ वाढवून मागितली असल्याचं म्हटलं होतं. तसंच, ‘हे प्रकरण मोठं आहे संपूर्ण देश हादरला आहे. देशात सध्या काहीच सुरु नाही. सध्या ही ५० लाखांची एकच केस आहे त्यांच्याकडे. मी १२० जणांची यादी दिल्यानंतर ईडीकडे खूप काम येईल,’ असा टोलाही त्यांनी लगावला होता.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times