वाचा:
नवी मुंबई महानगरपालिकेची फेब्रुवारीमध्ये प्रभागरचना जाहीर झाली आहे. त्यामुळे प्रभागात महाविकास आघाडीमध्ये कोणत्या पक्षाला व उमेदवाराला तिकीट मिळणार, यावरून राजकारण रंगू लागले होते. त्यातच प्रभाग क्रमांक दोनमध्ये शिवसेनेचे माजी विरोधी पक्षनेते विजय चौगुले व माजी स्थायी समिती सभापती हे या प्रभागामधून उभे राहण्यासाठी इच्छूक आहेत. यावरून सोशल मीडियावर आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. त्यातच गवते यांचे समर्थक अभंग शिंदे यांनी काही दिवसांपूर्वी शिवसेनेमध्ये प्रवेश केला आहे. तर रबाळे एमआयडीसी पोलीस ठाण्यात गवते यांच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. हा गुन्हा दाखल झाल्यांनतर नवी मुंबईतील शिवसेनेचे नगरसेवक एम. के. मढवी यांच्या मध्यस्थीने नगरसेवक अपर्णा गवते व दीपा गवते यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला आहे. भाजपचे तीन नगरसेवक शिवसेनेच्या गळाला लागल्यामुळे गणेश नाईक यांना हा धक्का मानला जात आहे. तर भाजपच्या तीन नगरसेवकांना शिवसेनेत प्रवेश दिल्यामुळे दिघा येथील शिवसेनेच्या इच्छूक उमेदवारांचा पत्ता कट होणार असून ते आता भाजपच्या वाटेवर असल्याचे कळते.
वाचा:
दरम्यान, नवी मुंबई महापालिका निवडणूक एप्रिलमध्ये होणे अपेक्षित होते. मात्र करोना संसर्गामुळे या निवडणुका लांबणीवर पडल्या. आता लवकरच ही निवडणूक जाहीर होण्याची शक्यता असून त्याआधी राजकारण चांगलंच तापताना दिसत आहे. सध्याची राजकीय गणितं लक्षात घेता गणेश नाईक यांच्यापुढे नवी मुंबईतील आपलं वर्चस्व कायम राखण्याचं मोठं आव्हान असणार आहे.
अपर्णा गवते म्हणाल्या…
‘मी आणि माझी नातेवाईक दीपा गवते आम्ही दोघींनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. माझे पती नवीन गवते हेसुद्धा लवकरच शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. आगामी पालिका निवडणुका आम्ही शिवसेनेकडून लढणार आहोत’, असे अपर्णा गवते यांनी सांगितले. अनधिकृत बांधकामांच्या मुद्द्यावर बोलताना, त्याबाबतीत आम्ही योग्यच होतो, हे कायदेशीर लढाई लढून आम्ही सिद्ध करणार आहोत, असेही अपर्णा गवते यांनी नमूद केले. दुसरीकडे दिघा येथील अनधिकृत बांधकामांबद्दल सातत्याने तक्रारी करणारे माहिती अधिकार कार्यकर्ते राजीव मिश्रा यांनी गवते यांच्या शिवसेना प्रवेशावर आश्चर्य व्यक्त केले आहे.
वाचा:
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times