राज ठाकरे यांनी मराठीसोबत हिंदुत्वाचा झेंडा खांद्यावर घेतला आहे. मनसे आता दोन झेंडे घेऊन पुढची राजकीय वाटचाल करणार आहे. त्यावरून शिवसेनेने राज ठाकरे यांना लक्ष्य केले आहे. ‘दोन झेंड्यांची गोष्ट’ असा मथळा देत मनसेच्या अधिवेशनातील राज यांचे भाषण म्हणजे बाळासाहेबांच्या एखाद्या जुन्या भाषणाची ‘कॉपी’ होती. ही ‘कॉपी’ त्यांनी जशीच्या तशी वाचून दाखवली, असा दावा शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’च्या आजच्या अग्रलेखात करण्यात आला आहे.
राज यांनी घेतलेल्या भूमिकेमागे भाजपचा हात असण्याचा संशय अग्रलेखात घेण्यात आला आहे. ‘मनसे’प्रमुखांना त्यांचे मुद्दे मांडण्याचा आणि पुढे रेटण्याचा पूर्ण अधिकार आहे, पण त्यांनी आज घेतलेल्या भूमिका व त्याच विषयावर पंधरा दिवसांपूर्वी मांडलेली मते मेळ खात नाहीत. भाजपची शिवसेनाद्वेषाची मूळव्याध दुसऱ्या मार्गातून बाहेर येत आहे व हे त्यांचे खेळ जुनेच आहेत, असा टोला अग्रलेखातून लगावण्यात आला आहे.
राज यांच्यावर फटकारे…
> देशात शिरलेल्या पाकिस्तानी आणि बांगलादेशी मुस्लिमांना हाकलून द्या. नव्हे हाकलायलाच पाहिजे, याविषयी दुमत असण्याचे कारण नाही, पण त्यासाठी एखाद्या राजकीय पक्षाने झेंडाच बदलावा ही गोष्ट गमतीची आहे. त्यापुढे जाऊन सांगायचे तर एक नव्हे, दोन दोन झेंड्यांची योजना करणे हे गोंधळलेल्या मनःस्थितीचे किंवा घसरलेल्या गाडीचे लक्षण आहे.
> भारतीय जनता पक्षाला हवे आहे म्हणून राज ठाकरे यांनी ‘हिंदू बांधव, भगिनी, मातांनो…’ अशी साद घातली असा टीकेचा सूर आहे. येथेही हाती काही लागेल याची शक्यता कमीच आहे.
> भाजप किंवा इतरांनी अगदी मेहबुबापासून इतर कुणाशीही निकाह लावला तरी चालतो, पण ही राजकीय व्यवस्था इतर कोणी केली की ते पाप ठरते. आम्ही काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत सरकार स्थापन केले हे पाप नसून समाजकार्य आहे.
> सत्तेसाठी शिवसेनेने रंग बदलला अशी भाषा करणे हे अकलेची दिवाळखोरी निघाल्याचे लक्षण आहे. शिवसेनेने रंग बदलला असे विचारणाऱ्यांनी स्वतःच्या चेहऱ्यावरील मुखवटे व चेहऱ्यावरचा अनेक रंगी मेकअप तपासून घ्यायला हवा.
> आर्थिक मंदी-बेरोजगारी अशा गंभीर प्रश्नांवरून देशाचे लक्ष वळविण्यासाठी अमित शहा नागरिकत्व कायद्याची खेळी करीत आहेत व ही खेळी यशस्वी होत असल्याचे त्यांचे राज ठाकरे यांचे मत होते, पण फक्त एकाच महिन्यात राज त्याच खेळीचे यशस्वी बळी ठरले असून त्यांनी ‘सीएए’ कायद्याच्या पाठिंब्याचा नवा झेंडा खांद्यावर घेतला आहे.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times