म. टा. प्रतिनिधी, नगर : सुमारे साडेतीन वर्षांपूर्वी शिर्डीतून अचानक बेपत्ता झालेली इंदूरची महिला अखेर इंदूरमध्येच सापडली. मधल्या काळात ती कोठे होते, याचे उत्तरही पोलिसांनी शोधून काढले आहे. ती आपल्या प्रियकरासोबत पळून गेली होती. त्याच्यासोबतच राहात होती. मात्र, पोलिसांचा ससेमिरा सुरू झाल्याने स्मृतीभ्रंश झाल्याचे नाटक करून ती महिला बाहेर आली. एका प्रकरणाचे गूढ उकलण्यात पोलिसांना यश आले असले तरी, मधल्या काळात शिर्डीतून मानवी तस्करी होते की काय, असा सवाल उपस्थित होऊन शिर्डीची मोठी बदनामी झाली होती.

विभागाच्या अतिरिक्त पोलीस अधीक्षक दीपाली काळे यांनी या प्रकरणाचे गूढ कसे उकलले याची माहिती पत्रकारांना दिली. शिर्डीतून सुमारे साडेतीन वर्षांपूर्वी बेपत्ता झालेली ही महिला १७ डिसेंबर २०२० रोजी इंदूरमध्ये तिच्या बहिणीच्या घरी सापडली. पोलिसांनी तिला तपासासाठी इकडे आणले. तिला कोर्टासमोरही हजर करण्यात आले. आपण चक्कर येऊन पडलो. त्यानंतर पुढे काय झाले ते काहीच आठवत नाही. आपण इंदूरमध्ये कसे पोहचलो, मधल्या काळात कोठे होते, काहीच आठवत नसल्याचे ही महिला सांगत होती. मात्र, पोलिसांचा संशय कायम होता. इंदूरमधील हनुमान गाथा सांगणाऱ्या ओमप्रकाश चंदेल याच्यावर पोलिसांचा संशय होता. तो या महिलेचा लग्नाआधीपासूनच प्रियकर आहे. त्याची माहिती मिळाल्यावर पोलिसांनी त्याच्याकडे चौकशी केली होती. त्यामुळे आता आपण पकडले जाऊ या भीतीने त्याने त्या महिलेला बहिणीच्या घरी सोडले आणि स्मृतीभ्रंश झाल्याचे नाटक करण्यास सांगितले.

मात्र, त्यांचे हे नाटक दीर्घकाळ टिकले नाही. पोलिसांनी त्यांचा भंडाफोड केला. ही महिला जेव्हा कुटुंबासह शिर्डीत दर्शनासाठी आली होती. तेव्हाच पळून जाण्याची योजना आखली होती. खरेदीच्या बहाण्याने बाहेर पडलेल्या महिलेने शिर्डीहून कोपरगाव गाठले. तेथून रेल्वेने ती पुण्याला गेली. तेथे तिचा प्रियकर चंदेल भेटला. नंतर पुण्याहून ते इंदूरला गेले. जेव्हा प्रकरण चंदेलच्या अंगाशी आले, तेव्हा त्याने तिला सोडून दिले.

मधल्या काळात त्या महिलेच्या पतीने तिचा शोध घेण्यासाठी मोठी मोहीम राबविली. पोलिसांकडे तक्रार केली. त्यानंतर पोलिसांनाच संशयाच्या भोवऱ्यात उभे केले. माहितीचा अधिकार कायद्याचा वापर करून शिर्डीतून बेपत्ता झालेल्या आणि पुन्हा न सापडलेल्या व्यक्तींची माहिती त्यांनी मिळविली. त्या आधारे हायकोर्टात याचिका दाखल केली. शिर्डीतून एवढी माणसे अचानक बेपत्ता होतात आणि परत सापडत नाहीत, याचा अर्थ मानवी तस्करी, अवयव चोरी असे प्रकार घडत असल्याची शंका उपस्थित करण्यात आली. कोर्टाने कागदपत्रे पाहून प्रकरण गांभीर्याने घेतले. थेट राज्याच्या पोलीस महासंचालकांना यामध्ये लक्ष घालून मानवी तस्करीच्या अनुषंगानेही तपास आणि उपाययोजना करण्याचा आदेश दिला. त्यामुळे शिर्डीची सर्वत्र खूपच चर्चा झाली. या घटनासंबंधी पोलिसांनी त्यावेळीच खुलासा करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, या माहिलेचा तपास लागत नसल्याने त्याकडे कोणी लक्ष द्यायला तयार नव्हते. अखेर हा सर्व संयशकल्लोळ निर्माण होण्यास कारणीभूत ठरलेल्या प्रकरणातील बेपत्ता महिला सापडली. ती कशी बेपत्ता झाली, हेही तपासात पुढे आले. त्यामुळे शिर्डीतून असे काही होत नाही, असे पोलिसांच्या सांगण्याला बळ आले आहे.

आता त्या महिलेचे, प्रियकराचे आणि कुटुंबीयांचे पुढे काय होणार हा प्रश्न आहे. मात्र, आमच्याकडे महिला बेपत्ता झाल्याचे प्रकरण तपासासाठी होते. ती महिला सापडली, मधल्या काळात ती कोठे होते, हेही पुढे आले. त्यामुळे आता आमचा या प्रकरणापुरता तपास संपला आहे, असेही काळे यांनी सांगितले. शिर्डीत प्रेमप्रकरणातून आत्महत्या, खूनाच्या घटनाही घडल्या आहेत. वृद्ध नातेवाईकांना शिर्डीतून आणून सोडून देण्याचे प्रकारही येथे घडतात. अन्य गुन्हेगारीही असली तरी, मानवी तस्करीच्या घटना मात्र आढळून आलेल्या नाहीत. या महिलेच्या प्रकरणामुळे हा कलंक शिर्डीला लागला होता.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here