संजय राऊत यांच्या पत्नीला ईडीची नोटिस आल्यानंतर शिवसैनिक चांगलेच आक्रमक झाले आहेत. तर, राऊत यांनीही भाजपला लक्ष्य करत राजकीय सूडानेच आता याला उत्तर दिलं जाईल, असा इशारा दिला होता. त्यानंतर आज संजय राऊतांनी ट्विट करत समझनेवालोंको इशारा काफी है, असं म्हणत भाजपला आव्हान दिलं आहे.
संजय राऊत यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलंय की, ‘माझ्या कुटुंबाला ईडीची नोटीस आल्याची बातमी प्रसारित झाल्यानंतर अचानक गोदी मिडियातील लहान लहान कमळं फुलायला लागली आहेत. या राजकीय पोपटांचा वापर राजकीय कामांसाठी कशा पद्धतीनं केला जातोय हे जनतेला माहित आहे,’ असं म्हणत राऊतांनी भाजपवर निशाणा साधला आहे.
‘माझ्या कुटुंबाचं नाव पीएमसी आणि एचडीएल घोटाळ्यांमध्ये विनाकारण गोवण्यात आलंय. त्यांना मी आव्हान देतोय की पुराव्यानिशी आरोप सिद्ध करा, नाहीतर कायदेशीर कारवाईला सामोरे जाण्यास तयार राहा,’ असं खुलं आव्हानचं राऊतांनी भाजपला दिलं आहे. तसंच, समझनेवालो के इशारा काफी है, असा सूचक इशाराही त्यांनी दिला आहे.
दरम्यान, पीएमसी बँक घोटाळा प्रकरणी ईडी कडून तपास सुरू असून याच प्रकरणात वर्षा राऊत यांना ईडीने समन्स बजावले होते. आता येत्या ५ जानेवारीला त्यांना ईडीसोमोर चौकशीसाठी हजर व्हावे लागणार आहे.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times