राज्यात करोना रुग्णांचा आलेख उतरताना दिसत आहे. गेल्या तीन दिवसांपासून बाधितांची संख्या झपाट्याने कमी होत आहे. नववर्षाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील करोनाची या आकडेवारीमुळं काही प्रमाणात दिलासा मिळत आहे. राज्यात करोनाच्या नव्या स्ट्रेनचा आतापर्यंत एकही रुग्ण आढळल्या नसल्याचं आरोग्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं असलं तरीही आरोग्य प्रशासनानं सावध भूमिका घेत योग्य ती खबरदारी घेण्यास सुरुवात केली आहे. आज राज्यात ४ हजार ९१३ रुग्णांनी करोनावर यशस्वी मात केली असून आजपर्यंत राज्यात एकूण १८,२४,९३४ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळं राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९४.६२ % एवढे झाले आहे.
दिवसभरात राज्यात ३ हजार ५३७ नवीन करोनाबाधित रुग्णांचे निदान झाले आहे. यामुळं राज्यातील बाधित रुग्णांची संख्या १९ लाख २८ हजार ६०३ इतकी झाली आहे. गेल्या २४ तासांत राज्यात ७० करोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. करोनामुळं दगावलेल्या राज्यातील एकूण रुग्णांची मृत्यूसंख्या ४९ हजार ४६३ इतकी झाली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.५६% एवढा आहे.
राज्यात सध्या ५३ हजार ०६६ अॅक्टिव्ह रुग्ण असून राज्यातील विविध रुग्णालयांत त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. मुंबईत सध्या ९ हजार ०४९ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. तर, पुणे जिल्ह्यात १३ हजार ७४३ रुग्ण सध्या उपचार घेत आहेत. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १,२६,७२,२५९ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १९,२८,६०३ (१५.२२ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात २,८०,६८२ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ३,१२७ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times