म.टा. प्रतिनिधी, नगर: यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे यांना न्याय मिळवून देण्यासाठी आज सायंकाळी नगरमध्ये कँडल मार्च काढण्यात आला. अनेक सामाजिक संस्था या मार्चमध्ये सहभागी झाल्या होत्या. जरे यांना लवकरात लवकर न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी सहभागी झालेल्या संस्था-संघटनांच्या कार्यकर्त्यांनी केली. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांनी पोलिसांवरच संशय व्यक्त केला. यातील प्रमुख आरोपी पत्रकार बाळ बोठे याच्या अटकेसंबंधी पोलिसांची भूमिका संशयास्पद असल्याचे जगताप म्हणाले.

जरे यांच्या हत्येला आज एक महिना पूर्ण झाला. त्यानिमित्त कुटुंबियांच्या पुढाकारातून हा कँडल मार्च आयोजित केला होता. त्यामध्ये विविध संस्था-संघटनांनी भाग घेतला. कापड बाजारातील भिंगारवाला चौक ते माळीवाडा बसस्थानकाजवळील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापर्यंत हा कँडल मार्च नेण्यात आला. तेथे मान्यवरांची भाषणे झाली.

‘जरे यांच्या खुनाची घटना अतिशय निंदनीय आहे. मुख्य आरोपींना अटक होऊन सखोल चौकशी व्हायला पाहिजे. असे प्रकार घडू नये यासाठी ठोस उपाययोजना केल्या पाहिजेत. जरे यांनी सामाजिक संघटनेच्या माध्यमातून नगर जिल्ह्यामध्ये काम केले. मराठा क्रांती मोर्चा, यशस्विनी महिला ब्रिगेडच्या माध्यमातून त्यांनी काम केले. महिलांच्या प्रश्नांवर त्यांनी अनेक वेळा आवाज उठवला आहे. प्रशासन आता बघायची भूमिका घेत आहे, ते योग्य नाही. म्हणून आता लोकांनी कठोर पावले उचलण्याची गरज आहे. आरोपींना कठोर शिक्षा झाली पाहिजे. हा कँडल मार्च त्यांच्या कुटुंबासाठी नाही तर, अशा प्रवृत्तींचा बिमोड केला पाहिजे यासाठी आहे. जरे यांना न्याय मिळेपर्यंत आपण आपला लढा सुरूच ठेवू. यासंदर्भात पोलिस प्रशासनाची भूमिका संशयास्पद आहे.’, अशी शंका आमदार जगपात यांनी व्यक्त केली आहे.

स्नेहालयचे डॉ. गिरीश कुलकर्णी म्हणाले, ‘जरे यांचा निर्घुण खून करण्यात आला. त्यांच्या मुलाने आरोपीचा फोटो काढला नसता तर आरोपीचा शोध लागला नसता. अनेकांना या गंभीर प्रकारची जाणीव नाही. जर आपल्या कुटुंबावर असा प्रसंग आला तर, करायचे काय हा खरा प्रश्न आहे. म्हणून जागृत नागरिकांनी आता पुढे येऊन निषेध करायला पाहिजे. आरोपी व्यक्ती कुणीही असली तरी आता आवाज उठवला गेला पाहिजे. मनाच्या पारतंत्र्यातून आता लोकांनी बाहेर यायला हवे. या प्रश्नावर कुणीच बोलत नाही, तसे व्हायला नको. मनातून निषेध नको, आता त्यांनी रस्त्यावर आले पाहिजे. मारेकर्‍यांना अटक होऊन त्याला योग्य शिक्षा मिळाली पाहिजे.’

रुणाल जरे म्हणाले, ‘मी मुलगा म्हणून नाही तर सामान्य नागरिक म्हणून सर्वांचे आभार मानतो. नगर जिल्ह्यामध्ये अनेक प्रश्न आहेत. ते सुटावे म्हणून माझी आई सातत्याने घडपडत होती. आईची हत्या कशामुळे झाली, का झाली याचा पोलीस तपास करतीलच. पण जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील, उपाधिक्षक अजित पाटील यांच्यासह त्यांच्या पोलिसांनी चांगल्याप्रकारे तपास केला आहे,’ असे ते म्हणाले.

या कँडल मार्चमध्ये यशस्विनी महिला ब्रिगेडसह रामरहिम बहुउद्देशीय सामाजिक प्रतिष्ठान, स्टुडंट पॉवर फाउंडेशन, संघर्ष समिती, जनआधार फाउंडेशन, मनसे, अहमदनगर सोशल क्लब, सकल मराठा समाज, राष्ट्रवादी काँग्रेस, फुले ब्रिगेड, नगर शहर काँग्रेस कमिटी, भिंगार शहर काँग्रेस कमिटी व टिपु सुलतान प्रतिष्ठान आदी संस्था व संघटनांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here