गावस्कर म्हणाले की, ” भारतीय संघासाठी तिसरा सामना हा सर्वात महत्वाचा असेल. त्यामुळे या सामन्यात रोहित शर्माला जर खेळवायचे असेल तर त्यासाठी हनुमा विहारीला संघाबाहेर ठेवावे लागेल. कारण रोहितला संघात घ्यायचे असेल तर एका खेळाडूला संघाबाहेर बसावे लागेल. माझ्यामते तरी हनुमा विहारीला संघाबाहेर ठेवून रोहितला यावेळी संधी द्यायला हवी.”
गावस्कर सलामीबाबत नेमके काय म्हणाले, पाहा…भारताच्या सलामीबाबत गावस्कर म्हणाले की, ” माझ्यामते रोहित शर्माला सलामीला पाठवायला हवे, रोहितबरोबर यावेळी मयांक अगरवालला सलामीला पाठवायला हवे. त्यानंतर शुभमन गिलला तिसऱ्या स्थानावर फलंदाजीला पाठवायला हवे. जर असे केले तर भारतीय संघाची फलंदाजी अधिक बळकट होईल, असे मला वाटते. त्यामुळे या सामन्यात मयांक अगरवालला संधी द्यायला हवी.”
गावस्कर यांनी केले अजिंक्य रहाणेचे कौतुक, पण…गावस्कर म्हणाले की, ” अजिंक्यच्या नेतृत्वाची स्तुती फक्त भारतीय नाही तर ऑस्ट्रेलियाचे दिग्गज खेळाडूही करताना दिसत आहेत. जेव्हा भारतीय संघाने सामना जिंकला तेव्हा रहाणेची ऑस्ट्रेलियाच्या माजी दिग्गज खेळाडूंनीही स्तुती केली. यामध्ये माजी कर्णधार रिकी पॉन्टिंग, अॅडम गिलख्रिस्ट, माइक हसी आणि शेन वॉर्न यांच्यासारख्या दिग्गजांचा समावेश होता. त्यामुळे अजिंक्यने फक्त भारताचीच नाही तर क्रिकेट विश्वातील प्रत्येकाची मनं जिंकली आहेत.”
गावस्कर यांनी कोणती खरी गोष्ट सांगितली…गावस्कर यावेळी म्हणाले की, ” अजिंक्य रहाणे हा एक हंगामी कर्णधार आहे. जेव्हा एखादा हंगामी कर्णधार चांगली कामगिरी करतो आणि त्यानंतर जेव्हा संघातील मुख्य खेळाडू परत येतो, तेव्हा हंगामी कर्णधाराला आपले स्थान सोडावे लागते. त्यामुळे अजिंक्यने चांगले नेतृत्व केल्यानंतरही जेव्हा कोहली संघात परत येईल, तेव्हा त्याच्याकडेच भारताच्या कसोटी संघाचे नेतृत्व देण्यात येईल.”
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times