रविंद्र थोरात असे या पोलीस अधिकाऱ्याचे नाव आहे. उस्मानाबाद येथे १३ जानेवारी रोजी हृदयविकाराच्या झटक्याने थोरात यांचे निधन झाले असल्याचे ‘नॅशनल हेराल्ड’ने वृत्त दिले आहे. रविंद्र थोरात हे सध्या लाचलुचपतविरोधी शाखेत उप अधीक्षक म्हणून कार्यरत होते. उस्मानाबाद येथील कार्यालयात काम करत असताना छातीत दुखत असल्यामुळे त्यांना स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर सोलापूर येथील रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आले. त्या दरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.
न्या. लोया यांचा नागपूरमध्ये मृत्यू झाल्यानंतर रविंद्र थोरात यांनी लोया कुटुंबीयांशी संपर्क साधला होता. राज्य गुप्तचर विभागाचे तत्कालीन प्रमुख संजय बर्वे यांनी न्या. लोया यांचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाला असल्याचे म्हटले होते. न्या. लोया यांचा मृत्यू एक डिसेंबर २०१४ रोजी झाला होता.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रविंद्र थोरात हे बर्वे यांच्या पथकातील सदस्य म्हणून काम करत होते. सुप्रीम कोर्टातील सुनावणीच्या वेळेस थोरात यांच्याकडे न्या. लोया यांच्या मृत्यू प्रकरणाशी निगडीत महत्त्वाच्या कागदपत्रांची जबाबदारी होती.
रविंद्र थोरात हे न्या. लोया यांच्या मृत्यू संबंधित प्रकरणात दोन वेळेस सहभागी होते. न्या. लोया यांचा नागपूर येथे २०१४ मध्ये मृत्यू झाल्यानंतर लोया कुटुंबीयांसोबत संपर्क साधण्याची जबाबदारी थोरात यांच्याकडे होती. मात्र, कुटुंबीयांशी तातडीने संपर्क साधता आला नसल्याचे त्यांनी म्हटले असल्याचे नॅशनल हेराल्डने म्हटले आहे. त्यानंतर महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी न्या. लोया यांच्या मृत्यू प्रकरणी चौकशी करण्यासाठी सध्याचे मुंबई पोलीस आयुक्त संजय बर्वे यांच्या नेतृत्वात एक पथक नेमले होते. त्या चौकशी पथकात रविंद्र थोरात हे सहभागी होते.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times