वृत्तसंस्था, कोलकाता :

राज्यात सत्ताधारी आणि राज्यपाल यांच्यातील वाद टोकाला पोहोचला आहे. राज्यपाल घटनाबाह्य वर्तन करीत असल्याचा आरोप करून त्यांची हकालपट्टी करण्याची मागणी तृणमूल काँग्रेसने पत्राद्वारे राष्ट्रपतींकडे केली आहे. राज्यपालांनीही राज्य सरकारविरोधात आक्रमक धोरण स्वीकारून, राज्यात विधानसभेची निवडणूक निष्पक्ष वातावरणात होणे शक्य नसल्याचे म्हटले आहे.

‘तृणमूल’चे राष्ट्रपतींना पत्र

पश्चिम बंगालचे राज्यपाल जगदीप धनखड हे राज्य सरकार आणि प्रशासनाविरुद्ध नियमिपणे जाहीर भाष्य करून घटनात्मक मर्यादेचे उल्लंघन करीत असल्याचा आरोप तृणमूल काँग्रेसने केला आहे; तसेच धनखड यांना राज्यपालपदावरून हटवण्याची मागणी तृणमूलच्या खासदारांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना पत्र पाठवून केली आहे. ‘राज्यपाल धनखड यांनी अलीकडील काळात घटनात्मक मर्यादेचे कसे उल्लंघन केले याची यादीच आम्ही राष्ट्रपतींना पाठवलेल्या पत्रामध्ये दिली आहे. त्यावरून घटनेच्या कलम १५६-१ अनुसार राज्यपालांवर योग्य ती कारवाई करण्याची विनंती आम्ही राष्ट्रपतींना केली आहे’, असे तृणमूल काँग्रेसचे राज्यसभा खासदार सुखेंदू शेखर रॉय यांनी पत्रकारांना सांगितले. ‘धनखड यांना काही सांगायचे असेल तर ते घटनेने दिलेल्या मार्गाने संवाद साधू शकतात, ट्वीट करून किंवा पत्रकार परिषद घेऊन नाही,’ असेही रॉय म्हणाले.

‘मुक्त वातावरणात निवडणूक नाही’

‘पश्चिम बंगालमध्ये मुक्त आणि निष्पक्ष वातावरणात निवडणूक होऊ शकत नाहीत,’ असा आरोप राज्यपाल जगदीप धनखड यांनी केला आहे. ‘लोकांना त्यांचा अधिकार बजावण्याची संधी मिळवून देणे माझे कर्तव्य आहे,’ असेही त्यांनी सांगितले.

‘राज्यात मुक्त आणि निपक्ष वातावरणात निवडणुका होणे शक्य नाही,’ असे राज्यपाल धनखड यांनी पत्रकारांना सांगितले. येथील मंदिराला भेट देण्यासाठी आले असता, त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ‘लोकांनी कोणाला मत द्यावे याच्याशी मला देणेघेणे नाही. मात्र, लोकांना त्यांचा मत देण्याचा अधिकार कोणत्याही हस्तक्षेपाशिवाय बजावता यावा यासाठी काम करणे माझे कर्तव्य आहे,’ असे राज्यपाल धनखड म्हणाले. ‘एप्रिल-मे मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीदरम्यान सरकारी यंत्रणेने तटस्थ राहावे,’ असे आवाहनही त्यांनी केले.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here