औरंगाबादः ‘शहराची नावं बदलून विकासाचे प्रश्न सुटत नाहीत. काँग्रेस पक्षाचा भर जनतेचे प्रश्न सोडवण्यावर, विकासाची काम करण्यावर आहे. औरंगाबादचे नाव बदलण्याचा विषय आमच्याकडे चर्चेसाठी आलेला नाही. ज्यावेळी समन्वय समितीमध्ये हा विषय चर्चेला येईल त्यावर काँग्रेस भूमिका मांडेल परंतु नाव बदलण्यास काँग्रेस पक्षाचा ठाम विरोध आहे, अशी भूमिका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष व महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी मांडली आहे.’ महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षाच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी थोरात औरंगाबाद येथे आले होते. त्यांनी स्थानिक पक्ष पदाधिकारी, कार्यकर्त्यांशी चर्चा केली.

शिवसेनेकडून औरंगाबादचा उल्लेख हा नेहमीच म्हणून करण्यात येतो. काही महिन्यांपूर्वीच औरंगाबाद विमानतळाचं नामांतर छत्रपती संभाजी महाराज विमानतळ करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला होता. त्यामुळं एकीकडे औरंगाबादचे नामांतर करण्यासाठी शिवसेनेकडून हालचाली होत असताना महाविकास आघाडीतल मित्र पक्षानं घेतलेल्या या भूमिकेमुळं महाविकास आघाडीत पुन्हा बिघाडी झाल्याची चर्चा सर्वत्र सुरु आहे.

‘राज्यात तीन पक्षाचे सरकार हे भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी आले आहे. हे सरकार किमान समान कार्यक्रमावर चालते. यात शहरांची नावं बदलण्याचा मुद्दा नाही. घटनेची शपथ घेऊन आम्ही सत्तेवर आलो आहोत. त्या घटनेतील तत्वाला बाधा येईल असा निर्णय घेतला जाणार नाही. नाव बदलण्याचा विषय आमच्यासमोर आलेला नाही परंतु ज्यावेळी चर्चेस येईल त्यावेळी काँग्रेस पक्षाचा नाव बदलण्यास विरोध आहे हे निदर्शनास आणून देऊ,’ असेही थोरात म्हणाले.

‘औरंगाबाद महानगरपालिका निवडणुकीत काँग्रेस पक्ष ताकदीने उतरेल आणि प्रत्येक वार्डाचा बारकाईने अभ्यास केला जात आहे. काँग्रेस कमकुवत आहे हा अपप्रचार असून त्याचा प्रत्यय नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद निवडणुका व विधान परिषद निवडणुकीत दिसून आलेला आहे. नागपूरचा ५५ वर्षांचा भाजपा आरएसएसचा बालेकिल्ला काँग्रेसने मोठ्या मताधिक्याने खेचून आणला, पुण्यातही विजय संपादन गेला. भाजपा या निवडणुकीत धुव्वा उडवला. काँग्रेस पक्षावर लोकांचा विश्वास आहे आणि महाविकास आघाडी सरकारच्या एका वर्षाच्या कामकाजावर लोक समाधानी आहेत. औरंगाबाद महानगरपालिकेच्या निवडणुकीतही काँग्रेस पक्ष चांगली कामगिरी करेल असा,’ विश्वासही थोरात यांनी व्यक्त केला.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here