मेलबर्न कसोटी सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियावर आठ विकेट्स राखून ऐतिहासिक विजय मिळवला. कारण मेनबर्नमध्ये दुसऱ्यांदा फलंदाजी करताना भारताला आतापर्यंत एकदाही विजय मिळवता आला नव्हता. पण पराभवानंतर ऑस्ट्रेलियाचा संघ चांगलाच बिथरलेला पाहायला मिळत आहे. त्यामुळेच त्यांनी सलामीवीर जो बर्न्सला संघातून काढण्याचा निर्णय घेतला आहे. पण आता तर ऑस्ट्रेलियाचा एक खेळाडू पूर्णपणे फिट नसूनही त्याला खेळवण्याचा विचार ते करत आहेत.
याबाबत ऑस्ट्रेलियाचे सहाय्यक प्रशिक्षक अँड्र्यू मॅकडोनाल्ड यांनी सांगितले की, ” धडाकेबाज सलामीवीर डेव्हिड वॉर्नर अजूनही पूर्णपणे फिट झालेला नाही, पण तरीही त्याला खेळवण्याचा विचार केला जात आहे. पण याबाबतचा अंतिम निर्णय मुख्य प्रशिक्षक जस्टीन लँगर आणि वॉर्नर यांच्या हातामध्येच असेल. जर वॉर्नर हा ९०-९५ टक्के फिट असेल तर नक्कीच कोच आणि त्याच्यामध्ये याबाबतचा अंतिम निर्णय घेतला जाईल. पण या परिस्थितीत वॉर्नर हा मैदानात जाऊन आपले काम चोख पार पाडू शकतो. त्यामुळे वॉर्नर तिसऱ्या सामन्यात खेळण्याची शक्यता आता वाढलेली आहे.”
गोलंदाजांचा कर्दनकाळ अशी बिरुदावली मिरवणारा डेव्हिड वॉर्नर तिसऱ्या कसोटी सामन्यापासून ऑस्ट्रेलियाच्या संघात दाखल होणार आहे, अशी बातमी आता पुढे येत आहे. आतापर्यंत ऑस्ट्रेलियाच्या धावा दोन्ही कसोटी सामन्यांमध्ये जास्त झाल्या नव्हत्या. त्यामुळे वॉर्नर संघात आल्यावर ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजीला बळकटी मिळेल, असे वाटत आहे. वॉर्नरबरोबर यावेळी अजून दोन खेळाडूंचा ऑस्ट्रेलियाच्या संघात समावेश झाला आहे.
वॉर्नरबरोबरच ऑस्ट्रेलियाच्या संघात विल पुकोवस्कीचाही समावेश होणार असल्याचे पाहायला मिळत आहे. त्याचबरोबर दुखापतीमुळे संघाबाहेर असलेला वेगवान गोलंदाज सीन अॅबॉटचेही यावेळी ऑस्ट्रेलियाच्या संभाव्य संघात पुनरागमन होणार असल्याचे दिसत आहे. दुसऱ्या सामन्यात पराभवाचा धक्का बसल्यावर ऑस्ट्रेलियाने तिसऱ्या कसोटी सामन्यासाठी आपल्या संघात महत्वाचे बदल केले आहेत. त्यामुळे हे बदल आता संघाच्या किती पथ्यावर पडतात, याची उत्सुकता चाहत्यांना नक्कीच असेल.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times