चिंतामणी पत्की, पुणे

पुणे : ‘डिसेंबर महिन्यात करोनावरची घेतली. करोनावर आलेल्या विविध लस सुरक्षित आहेत. लशीचे कोणतेही दुष्परिणाम दिसून आलेले नाहीत. पुढील काही दिवस काळजी घ्यावी लागेल. मात्र, लवकरच आपण आनंदी आयुष्य जगू शकू,’ अशी उमेद अमेरिकेत करोना विषाणूशी लढणारे डॉ. संतोष काळे यांनी ‘मटा’शी बोलताना जागवली. डॉ. काळे यांनी नुकतीच फायजर कंपनीची लस टोचवून घेतली आहे. लस घेतल्यानंतर दुष्परिणाम दिसून येत नसल्याने नवीन वर्षातील हे शुभ वर्तमान ठरण्याची शक्यता आहे.

मूळचे सोलापूर जिल्ह्यातील बार्शीचे डॉ. संतोष काळे अमेरिकेच्या टेक्सास राज्यातील ह्युस्टन शहरातील सार्वजनिक हॉस्पिटलमध्ये अनेक वर्षांपासून कार्यरत आहेत. गेली दहा महिने ते करोनारुग्णांवर उपचार करीत आहेत. जगासाठी प्रतीक्षा असलेल्या लसीकरणाचा अनुभव त्यांनी ‘मटा’शी बोलताना सांगितला.

‘अमेरिकेतील सेंट्रल फॉर डिसिस कंट्रोल (सीडीसी), सेंट्रल ड्रग्ज अॅडमिनिस्ट्रेशन (सीडीए) आणि एनआयएच या राष्ट्रीय संस्थांनी सुरुवातीपासून सामाजिक आरोग्य आणि लशीसाठी काम केले. निधी संकलित केला. लस येणार की नाही याची शाश्वती नसताना लस प्रत्यक्षात आली. ती सुरक्षित असल्याचे दिसून येत आहे. फायझर लशीचा पहिला डोस घेतल्यानंतर तीन आठवड्यांनी दुसरा डोस घ्यावा लागतो. कोणत्याही इंजेक्शनप्रमाणे ही लस टोचवून घ्यावी लागते. हजारो लोकांना ही लस दिली असून, माहिती संकलित केली जात आहे. माझ्यासह कोणालाही कोणताही त्रास झाल्याचे उदाहरण नाही. लस घेतल्यानंतर किंवा दुसऱ्यांदा करोना होण्याची शक्यता जवळपास नाही,’ अशी माहिती काळे यांनी दिली.

अमेरिकेत आता लॉकडाउन नाही

अमेरिकेत दुसऱ्या कशापेक्षाही ‘स्वातंत्र्य’ या मूल्याला अधिक महत्त्व असल्याने तसेच राजकीय वातावरण बदलल्याने अमेरिकेत यापुढे लॉकडाउन शक्य नाही. मी माझी काळजी घ्यायला सक्षम आहे, असा विचार लोक करू लागले आहेत,’ असे डॉ. संतोष काळे यांनी सांगितले.

करोनामुक्त जीवन कधी सुरू होईल, हे सांगणे आत्ता शक्य नसले तरी नवीन वर्षांत सकारात्मक बदल होताना दिसतील. करोनाच्या नवीन प्रकारामुळे यापुढेही काळजी घ्यावी लागणार आहे. करोनाच्या प्रतिबंधासाठी आधीचे उपाय अंमलात आणावे लागतील; पण लसीकरणाची मोहीम जलद झाल्यानंतर दिलासा मिळेल. नवीन वर्षांत हे आव्हान कमी होऊन आपण हळूहळू आनंदी जीवनाकडे वाटचाल करू शकू.

– डॉ. संतोष काळे

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here