इंदूर: नागरिकत्व दुरुस्ती कायदा आणि एनआरसीच्या विरोधात देशभर आंदोलन सुरू असतानाच मध्यप्रदेशातील इंदूरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. हे आंदोलन सुरू असताना सीपीएमच्या एका कार्यकर्त्याने ‘लाल सलाम’ लिहिलेल्या पत्रकांचं वाटप केल्यानंतर स्वत:हून जाळून घेत आत्मदहन करण्याचा प्रयत्न केल्याचं सूत्रांनी सांगितलं. या कार्यकर्त्याने स्वत:ला जाळून घेण्याचा प्रयत्न केल्याने आंदोलकांमध्ये एकच गोंधळ उडाला. त्यामुळे त्याला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्याची प्रकृती अधिक गंभीर असल्याचं सांगण्यात येत आहे. दरम्यान, सीएएला विरोध म्हणून त्याने आत्मदहन केलं का? याबाबतच्या वृत्ताला पोलिसांनी अद्याप दुजोरा दिलेला नाही.

रमेश प्रजापत असं या ६५ वर्षीय कार्यकर्त्याचं नाव आहे. प्रजापत हे टेलरिंगचं काम करतात. इंदूरमध्ये सीपीएमची सीएएविरोधात निदर्शने सुरू होती. यावेळी रस्त्याच्याकडेला उभं राहून प्रजापत लोकांना पत्रकं देत होता. लाल सलाम लिहिलेल्या या पत्रकावर भगत सिंग, अशफाकउल्ला खान आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे फोटो होते. त्यावर ‘तू न हिंदू बनेका ना मुसलमान बनेगा, इंसान की औलाद है इंसान बनेगा,’ या हिंदी गीताच्या ओळीही लिहिलेल्या होत्या. संपूर्ण देशात नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या विरोधात आंदोलन सुरू आहे. १४४ कलम लागू केल्यानंतरही स्त्रिया आणि तरूण रस्त्यावर उतरले आहेत. पोलिसांनी आंदोलकांवर केलेल्या गोळीबारात कमीत कमी ३० लोकांचा मृत्यू झाला आहे. हजारो आंदोलकांना अटक करण्यात आलेली आहे. त्यामुळे ही हुकुमशाही चालणार नाही, असंही या पत्रकात नमूद करण्यात आलं आहे. पत्रकांचं वाटप करत असतानाच प्रजापत यांनी अचानक स्वत:ला आग लावून जाळून घेण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे आंदोलकांमध्ये आणि आजूबाजूच्या लोकांमध्ये एकच घबराट पसरली. काही कार्यकर्त्यांनी पुढे येऊन आग विझवण्याचा प्रयत्न करून प्रजापत यांना तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. पोलिसांनीही तात्काळ घटनास्थळी धाव घेतली.

दरम्यान, प्रजापत यांची प्रकृती अत्यंत चिंताजनक असून ते बोलूही शकत नसल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे. दरम्यान, प्रजापत यांनी स्वत:ला का जाळून घेतलं? याची माहिती मिळालेली नाही. त्याबाबत काहीही सांगणं घाई होईल, असं तुकोगंज पोलीस ठाण्याचे प्रभारी निर्मल कुमार विश्वास यांनी सांगितलं. तर सीपीएमचे राज्य सेक्रेटरी कैलाश लिम्बोदिया यांनी प्रजापत हे पक्षाचे कार्यकर्ते होते. त्यांनी आत्मदहनाचा प्रयत्न केल्याची माहिती मिळताच आम्ही घटनास्थळी पोहोचलो, असं सांगितलं. प्रजापत यांनी आत्महत्या का केली? याबाबत भाष्य करणं ही घाईच होईल, असं लिम्बोदिया यांनीही सांगितलं.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here