वॉशिंग्टन: अमेरिकेत पुन्हा एकदा संसर्गाचे थैमान सुरू झाले आहे. करोनाबाधितांची आणि मृतांच्या वाढत्या संख्येमुळे जगात चिंता व्यक्त केली जात आहे. अमेरिकेत करोनाचा सर्वाधिक संसर्ग फैलावला असून मागील ४८ तासांमध्ये जवळपास ७४६९ बाधितांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

अमेरिकेतील जॉन हॉपकिन्स विद्यापीठाने गुरुवारी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार अमेरिकेत मागील २४ तासांमध्ये ३७४४ जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तर, त्याआधी एक दिवसापूर्वीच करोनाने ३७२५ जणांचे बळी घेतले होते. अमेरिकेत करोनाबाधितांची संख्या वेगाने वाढत आहे, अमेरिकेत बाधितांची संख्या एक कोटी ९७ लाखांच्या आसपास पोहचली आहे. तर, तीन लाख ४२ हजारजणांना आपले प्राण गमवावे लागले आहे.

वाचा:

करोनाच्या संसर्गामुळे अमेरिकेत वीस लाखांहून बालकांनाही करोनाची लागण झालेली आहे. त्यापैकी काहीजणांची प्रकृती गंभीर आहे. अमेरिकेतील करोनाच्या संसर्गाला अटकाव करण्यासाठी लसीकरण मोहीम सुरू करण्यात आली आहे. आतापर्यंत हजारो आरोग्य कर्मचारी व इतर फ्रंटलाइन कर्मचाऱ्यांनी लस घेतली आहे. अमेरिकेत फायजर-बायोएनटेक आणि मॉडर्नाच्या लशीला मंजुरी देण्यात आली आहे.

वाचा:
जगभरात करोनाबाधितांची संख्या ८ कोटी ३१ लाखांहून अधिक झाली असून १८ लाख १२ हजार ६४५ जणांचा मृत्यू झाला आहे. करोनाच्या नव्या स्ट्रेनमुळे बाधितांची संख्या वाढत आहे. अमेरिकेत कॅलिफोर्नियात नव्या स्ट्रेनचे दोन रुग्ण आढळले आहेत. ब्रिटनमध्ये नवा स्ट्रेन आढळल्यानंतर अनेक देशांनी ब्रिटनसोबतची विमानसेवा स्थगित केली आहे.

वाचा:

दरम्यान, जगात पहिल्यांदा करोना संसर्गाचा फैलाव सुरू झालेल्या चीनने अखेर आपल्या लशीला सशर्त मान्यता दिली आहे. चीनने सिनोफार्म कंपनीने विकसित केलेल्या लशीला मंजुरी दिली. करोनाचा फैलाव सुरू झाल्यानंतर काही लशींची चाचणी सुरू झाली होती.

वैद्यकीय उत्पादन प्रशासन उपायुक्त चेन शिफेई यांनी सांगितले की, लशीला बुधवारी रात्री मंजुरी देण्यात आली. ‘बीजिंग इन्स्टिट्यूट ऑफ बायोलॉजिकल प्रोडक्ट’ने निर्मिती केलेली लस देण्यात येणार आहे. या कंपनीला चीन सरकारकडून अनुदान देण्यात येते. करोनापासून बचाव होण्यासाठी लशीचे दोन डोस घ्यावे लागणार आहेत. ही लस ७९.३ टक्के प्रभावी असल्याचे चाचणीत आढळून आल्याची माहिती कंपनीच्यावतीने दिली. जगभरात लस स्पर्धेत असलेल्या कंपनीपैकी सिनोफार्म ही महत्त्वाची कंपनी आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here