प्रवीण चौधरी/ म. टा. प्रतिनिधी, जळगाव: शहरापासून जवळच असलेल्या येथील तरुणीचा गावातीलच तरुणाशी झाला. दोन दिवसांपूर्वीच पतीसह सासरी गेलेल्या या तरुणीचा थर्टीफर्स्टच्या रात्री संशयास्पद मृत्यू झाला. विवाहितेच्या माहेरच्यांनी तिचा पती, त्याचे मित्र व सासरच्या लोकांवर आरोप करीत शासकीय रुग्णालयात संताप व्यक्त केला. जोपर्यंत त्यांना अटक होत नाही, तोपर्यंत मृतदेह स्वीकारणार नाही,असा पावित्रा त्यांनी घेतला. त्यामुळे शासकीय रुग्णालयात तणाव निर्माण झाला होता. आरती विजय भोसले (२०, रा. पाळधी) असे मृत विवाहितेचे नाव आहे.

जळगाव जिल्ह्यातील धरणगाव तालुक्यात पाळधी येथील आरती भोसले ही तरूणी ६ डिसेंबरच्या रात्रीपासून बेपत्ता झाली होती. त्यामुळे आरतीच्या कुटुंबियांनी पाळधी पोलिसांत ती बेपत्ता झाल्याची तक्रार केली होती. पोलिसांसह कुटुंबियांकडून तिचा शोध सुरू असतानाच, २९ डिसेंबर रोजी आरती पाळधी गावातीलच प्रशांत विजयसिंग पाटील या तरूणासोबत विवाह करून परतली. आरती व प्रशांत मंगळवारी पाळधी पोलीस ठाण्यात हजर झाले. पोलिसांना प्रेमविवाह केल्याचे सांगितल्यानंतर पोलिसांनी दोघांच्या कुटुंबियांना पोलीस ठाण्यात बोलावून घेतले. दोन्ही कुटुंबियांची संमती मिळाल्यानंतर आरती त्याच दिवशी पती प्रशांतसोबत पाळधी येथील प्रशांतच्या घरी अर्थात सासरी गेली.

दोनच दिवसात संशयास्पद मृत्यू

आरती हिला सासरी जाऊन अवघे दोन दिवस झाले होते. त्यानतंर आज शुक्रवारी सकाळी आरतीचा पती प्रशांत याचा मित्र आरतीच्या माहेरी आला. आरतीचा मृत्यू झाल्याचे त्याने आईला सांगितले. त्यांना मोठा धक्का बसला. त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. आरतीच्या काकूही घटनास्थळी आली. त्यावेळी आरतीचा मृतदेह संशयास्पद स्थितीत आढळून आल्याचे त्यांनी सांगितले.

घातपात केल्याचा आरोप; शासकीय रुग्णालयात तणाव

जिल्हा रूग्णालयात सकाळी मृतदेह आणल्यानंतर पती, त्याचे वडील व त्याच्या मित्रांनीच आरतीचा घातपात केल्याचा आरोप माहेरच्यांनी केला. तिच्यावर अत्याचार केल्याचाही खळबळजनक आरोप आरतीच्या वडीलांनी केला आहे. दरम्यान, जेव्हा आरती हिचा मृतदेह पाहिला तेव्हा तिच्या अंगावर कपडे नव्हते, त्यामुळे हा घातपात असून, संबंधितांना अटक करण्यात यावी, अशी मागणी करीत त्यांनी संताप व्यक्त केला. ३१ डिसेंबरला आरतीचा पती व त्याच्या मित्रांनी घरात रात्री पार्टी केली. त्यानंतर घातपात केला असून जोपर्यंत त्यांना अटक होत नाही, तोपर्यंत मृतदेह स्वीकारणार नाही असा पवित्रा आरतीच्या कुटुंबियांनी घेतला. त्यामुळे काहीवेळ रुग्णालायात तणाव निर्माण झाला होता. पाळधी पोलीसही जिल्हा रूग्णालयात पोहोचले.

पती व मित्र ताब्यात; माहेरच्यांनी स्वीकारला मृतदेह

दुपारी मृत विवाहितेच्या कुटुंबियांचा संताप लक्षात घेत, पाळधी पोलीस ठाण्याचे एपीआय हनुमंतराव गायकवाड हे जिल्हा रूग्णालयात पोहोचले. त्यांनी कुटुंबियांची समजूत काढली. आरतीचा पती व त्याच्या दोन मित्रांना ताब्यात घेतल्याचे सांगितले. त्यानंतर मृत विवाहितेच्या वडीलांनी मृतदेह स्वीकारला. दुपारी ४ वाजेच्या सुमारास मृतदेह पाळधी येथे नेण्यात आला.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here