नवी दिल्ली : सरत्या वर्षातील अखेरचा महिना केंद्र सरकारसाठी आर्थिक आघाडीवर शुभसंकेत देणारा ठरला आहे. डिसेंबरमध्ये वस्तू आणि सेवा करातून सरकारला १,१५,१७४ कोटी रुपयांचा विक्रमी महसूल मिळाला आहे. चालू आर्थिक वर्षात करोनाचे संकट असून देखील आतापर्यंतची एका महिन्यातील ही सर्वोत्तम कामगिरी आहे.

केंद्र सरकारने आज जीएसटी कर संकलनाची आकडेवारी जाहीर केली. ज्यात डिसेंबर महिन्यात संकलित केलेला एकूण जीएसटी महसूल १, १५, १७४ कोटी रुपये आहे, त्यापैकी सीजीएसटी २१, ३६५ कोटी रुपये आहे, एसजीएसटी २७,८०४ कोटी रुपये आणि आयजीएसटी ५७,४२६ कोटी रुपये संकलीत झाले आहेत. ३१ डिसेंबर २०२० पर्यंत नोव्हेंबर महिन्यात दाखल झालेल्या जीएसटीआर -3 बी विवरणपत्रांची एकूण संख्या ८७ लाख आहे.

सरकारने नियमित तडजोड म्हणून आयजीएसटीमधून २३,२७६ कोटी रुपये सीजीएसटीला आणि १७,६८१ कोटी रुपये एसजीएसटीला दिले आहेत. डिसेंबर महिन्यात नियमित निपटाऱ्यानंतर केंद्र सरकार आणि राज्य सरकारांनी मिळविलेला एकूण महसूल सीजीएसटीसाठी ४४,६४१ कोटी रुपये आणि एसजीएसटीसाठी ४५,४८५ कोटी रुपये आहे.

जीएसटी महसुलात सुधारणेचा अलिकडचा कल पाहता, डिसेंबर महिन्यातील महसूल मागील वर्षीच्या याच महिन्यातील जीएसटी महसूलपेक्षा १२ टक्के अधिक आहे. या महिन्यात वस्तूंच्या आयातीमधून मिळणारा महसूल २७ टक्के जास्त होता आणि देशांतर्गत व्यवहारातून (सेवांच्या आयातीसह) मिळणारा महसूल ८ टक्के जास्त होता,जीएसटी लागू झाल्यापासून डिसेंबर २०२० मधील जीएसटीचा महसूल सर्वाधिक आहे. प्रथमच जीएसटी संकलनाने १.१५ लाख कोटींचा आकडा पार केला आहे. नोव्हेंबर महिन्यात जीएसटीमधून १,०४,९६३ कोटींचा महसूल मिळाला होता. गेल्या २१ महिन्यांतील मासिक महसुलातली ही सर्वाधिक वाढ आहे. महामारीनंतर वेगवान आर्थिक भरारी आणि जीएसटी चुकवणाऱ्यांविरोधात देशव्यापी मोहिमेचा एकत्रित परिणाम यामुळे करपालन सुधारले आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here