जळगाव: जिल्ह्यातील तालुक्यामधील ग्रामपंचायतीची निवडणूक बिनविरोध झाली आहे. गेल्या पन्नास वर्षाची परंपरा या गावातील ग्रामस्थांनी यंदाही कायम राखली आहे. धारागीर ग्रामपंचायतीचे विशेष म्हणजे या गावात १९७० पासून एकदाही ग्रामपंचायत निवडणुकीसाठी मतदान झालेले नाही. यंदा देखील धारागीर हे जिल्ह्यातील ७८३ ग्रामपंचायतींपैकी बिनविरोध निवडणूक होणारे पहिले गाव ठरले आहे. ( )

वाचा:

एरंडोल तालुक्यातील १३०० लोकसंख्या असलेल्या धारागीर गावात पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध पार पडत आहे. गावातील ग्रामस्थांनी गावात एकी राहावी तसेच गाव सुखी राहावे यासाठी ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करण्याचा पायंडा सुरू केला. १९७० मध्ये सुरू केलेली ही आदर्श परंपरा आज देखील कायम आहे. गावाच्या विकासासाठी ग्रामस्थांनी ही संकल्पना राबवली होती. ग्रामपंचायतीची निवडणूक बिनविरोध होण्याचे यंदा पन्नासावे वर्ष आहे. या पंरपरेमुळे गावातील सलोखा व एकोपा आज देखील टिकून आहे.

भाऊबंदकी टाळण्यासाठी सुरू केली पंरपरा

पन्नास वर्षांपूर्वी धारागीर गावात देखील ग्रामपंचायत निवडणुकीत चुरस पाहायला मिळायची. या निवडणुकीत भाऊबंदकी उफाळून मोठ मोठे वाद होत होते. त्यामुळे पोलीस व कोर्ट-कचेऱ्या फिरण्याची वेळ ग्रामस्थांवर येत असे. या सर्व वादांमुळे गावाचा विकास देखील खुंटला होता. हा सर्व प्रकार गावातील तरुण व समजूतदार ग्रामस्थांच्या लक्षात आल्यावर त्यांनी एकत्र बसून गावाच्या विकासासाठी तसेच वाद- विवाद टाळण्यासाठी ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करण्याचा निर्णय घेतला. त्यानतंर ग्रामपंचायत निवडणुक बिनविरोध करण्याची पंरपराच सुरू झाली ती आजदेखील सुरु आहे.

वाचा:

प्रत्येकाला मिळते संधी

धारागीर गावातील रहिवासी असलेले माजी आमदार यांच्याच संकल्पनेतून निवडणूक बिनविरोध करण्याचा पायंडा पडला. त्यावेळी तारुण्यात असणाऱ्या महेंद्रसिंग पाटील यांनी गावातील इतर तरुणांच्या मदतीने निवडणूक बिनविरोध करण्याबाबत तत्कालीन गाव पुढाऱ्यांना विनंती केली. ही विनंती मान्य झाली अन् तेव्हापासून धारागीर गाव बिनविरोध ग्रामपंचायत निवडणुकीसाठी आदर्श म्हणून पुढे आले. विशेष म्हणजे, गावातील प्रत्येक समाजातील व्यक्तीला प्रतिनिधित्वाची संधी मिळत असल्याने स्पर्धा, हेवेदावे होत नाहीत.

ग्रामस्थांकडून आनंदोत्सव

यंदाच्या निवडणुकीतही जिल्ह्यातील पहिली बिनविरोध ग्रामपंचायत ठरली आहे. ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोधची परंपरा कायम राहिल्याने ग्रामस्थांनी गावातील विठ्ठल मंदिरात एकत्र येऊन एकमेकांना साखर भरवून आनंदोत्सव साजरा केला. धारागीर ग्रामपंचायतीच्या सात जागांसाठी केवळ सातच अर्ज आल्याने निवडणूक बिनविरोध झाली आहे.

वाचा:

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here