म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई

मुंबईच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानामध्ये सरत्या वर्षाला निरोप देताना ” प्रजातीच्या गिधाडाचे दर्शन झाले. हिमालय, तिबेटमध्ये आढळणारा हा पक्षी मुंबईत दिसल्याने त्याबद्दल चर्चा रंगली. हे सर्वात मोठ्या गिधाडांपैकी एक आहे. निसर्ग आणि नैसर्गिक संसाधनांची आंतरराष्ट्रीय संवर्धन संस्था अर्थात ‘आययूसीएन’ने या प्रजातीला धोका निर्माण होऊ शकतो, अशी शक्यता वर्तवली आहे. सध्या मात्र यांची संख्या स्थिर असल्याचे दिसते.

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील टॅक्सीडर्मी केंद्रामध्ये काम करणारे कर्मचारी चैत्राल धराधर यांना संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात हे गिधाड पहिल्यांदा दिसले. हे ‘हिमालयीन गिफ्रन’ असल्याचे निश्चित झाल्यानंतर, इतर कर्मचाऱ्यांनीही आवर्जून हे गिधाड पाहिले. सुमारे तीन तास हे गिधाड एकाच परिसरात होते. यानंतर शुक्रवारी १ जानेवारी रोजीही ते सकाळी काही काळ दिसले. आता हे गिधाड या परिसरात आणखी दिसत राहील का याचा अधिक अभ्यास केला जाईल, अशी माहिती शैक्षणिक अधिकारी जयेश विश्वकर्मा यांनी दिली. मुंबईमध्ये या आधी हिमालयीन ग्रिफन आढळले होते, असे पक्षी निरीक्षकांकडून सांगितले जाते. मात्र याची कागदोपत्री नोंद आढळत नाही, असेही विश्वकर्मा यांनी सांगितले. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या परिसरातील कावळे या गिधाडाला तेथून उडवून लावण्याचा, हल्ल्याचा प्रयत्न करत होते. मात्र त्यानंतरही हे गिधाड तिथे सुमारे तीन तास बसून होते. गिधाड हे मृत प्राण्यांच्या अवशेषावर जगते. डायक्लोफिनॅक या औषधाचा वापर वाढल्यानंतर गिधाडांच्या अस्तित्वावर संकट ओढवले. त्यानंतर कावळे, घारी यांनी त्यांची जागा व्यापली. त्यामुळे मुंबईमध्ये हे गिधाड दिसणे ही घटना महत्त्वाची ठरते.

लहान गिधाडांची भटकंती शक्य
ही गिधाडे हिमालय आणि थंड प्रदेशामध्ये आढळतात. तिथेच त्यांचे प्रजनन कार्य चालते. एखादे वयाने लहान असलेले गिधाड मात्र अन्य एखाद्या प्रदेशामध्ये आपले अस्तित्व सिद्ध करण्याच्या उद्देशाने हिमालय किंवा आजुबाजूचा परिसर सोडून दूर जाऊ शकते, अशीही आत्तापर्यंतची निरीक्षणे आहेत. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात आलेले हे गिधाड तशाच पद्धतीने भटकत आले असावे, अशी शक्यता पक्षीतज्ज्ञ डॉ. गिरीश जठार यांनी वर्तवली. असे गिधाड भटकत जाऊन दक्षिणेकडे गोवा, हैदराबाद येथेही दिसले आहे. तापमानात बदल होऊ लागले किंवा किनापट्टीवर आर्द्रतेची जाणीव होऊ लागली की, हे पक्षी परत आपल्या मूळच्या भूभागामध्ये परत जाण्याची शक्यता अधिक असते, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here