नवी दिल्ली: कोणत्याही उद्देशासाठी संघर्ष करणाऱ्या लोकांनी आणि विशेषत: तरुणांनी राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या अहिंसेच्या मंत्राचं कायम स्मरण ठेवावं. गांधीजींची अहिंसा ही मानवतेसाठीची अमूल्य देणगी आहे, असं राष्ट्रपती यांनी सांगितलं. प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्राला उद्देशून केलेल्या भाषणात कोविंद यांनी तरुणांना हे आवाहन केलं. नागरिकत्व दुरुस्ती कायद्यावरून देशभरात सुरू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कोविंद यांचं हे आवाहन अत्यंत महत्त्वाचं मानलं जात आहे.

संपूर्ण देशात उद्या साजऱ्या होणाऱ्या ७१व्या प्रजासत्ताक दिनाच्या कोविंद यांनी देशवासियांना शुभेच्छा दिल्या. राष्ट्रनिर्मितीसाठी महात्मा गांधींच्या विचार आजही तंतोतंत लागू होतात. सत्य आणि अहिंसेचा त्यांनी दिलेला संदेश आजही तितकाच आवश्यक आहे. त्यामुळे कोणत्याही उद्देशासाठी संघर्ष करणाऱ्यांनी विशेष करून तरुणांनी महात्मा गांधींच्या अहिंसेच्या मंत्राचं कायम स्मरण ठेवावं, असं आवाहन रामनाथ कोविंद यांनी केलं. लोकशाही सत्ताधारी आणि विरोधी पक्षाची भूमिका महत्त्वाची असते. राजकीय विचारांच्या अभिव्यक्तीबरोबरच देशाचा समग्र विकास आणि देशवासियांच्या कल्याणासाठी दोघांनीही खांद्याला खांदा लावून काम केलं पाहिजे, असंही कोविंद यांनी सांगितलं.

आपल्या संविधानाने सर्वांना नागरिक म्हणून काही अधिका प्रदान केले आहेत. संविधानातील न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधूतेप्रती आपण सर्वच कटीबद्ध आहोत, असंही त्यांनी सांगितलं. यावेळी कोविंद यांनी केंद्र सरकारच्या योजनांचं कौतुकही केलं. जनकल्याणासाठी केंद्र सरकारने अनेक योजना राबविल्या आहेत. देशातील नागरिकांनीही स्वत:हून या योजना लोकप्रिय केल्या आहेत. जनतेच्या सहभागामुळेच स्वच्छ भारत अभियान अत्यंत कमी कालावधीत लोकप्रिय झाले आहे. इतकंच नव्हे तर गॅस सबसिडीचा त्याग करण्यापासून ते ऑनलाइन व्यवहारांपर्यंतच्या प्रत्येक गोष्टीत जनतेने हिरहिरीने भाग घेतल्याचं त्यांनी सांगितलं.

जम्मू-काश्मीर असो की लडाख असो. पूर्वेकडील राज्य असोत की हिंद महासागराजवळील बेटं असोत. देशाच्या प्रत्येक कोपऱ्यात संपूर्ण विकास करण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील आहे. देशाच्या विकासासाठी मजबूत अंतर्गत सुरक्षा व्यवस्था असणेही महत्वाचे आहे. त्यामुळेच देशांतर्गत सुरक्षा मजबूत करण्यासाठी अनेक महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले आहेत, असं ते म्हणाले. देशातील कोणतंही मुल किंवा कोणताही तरुण शिक्षणापासून वंचित राहणार नाही हाच आपला प्रयत्न असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.

यावेळी त्यांनी इस्रोच्या कामगिरीचंही कौतुक केलं. तसेच भारतीय लष्कर, अर्धसैनिक दल आणि अंतर्गत सुरक्षा दलाचीही राष्ट्रपतींनी मुक्तकंठाने प्रशंसा केली. देशाची अखंडता, एकता आणि सुरक्षा कायम राखण्यासाठी लष्कराने दिलेलं योगदान आणि बलिदान अतुलनीय असल्याचं त्यांनी सांगितलं. अनिवासी भारतीयांच्या योगदानाचीही राष्ट्रपतींनी आपल्या भाषणात दखल घेतली.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here