रिझर्व्ह बँकेने काही महिन्यांपूर्वी ‘पॉझिटिव्ह पे’ सिस्टीमचा अवलंब करण्यात येणार असल्याचे जाहीर केले होते. त्या अंतर्गत पन्नास हजार रुपयांवरील रक्कम अदा करण्यात येणार असेल, तर काही तपशील पुन्हा तपासण्यात येणार आहेत. ‘पॉझिटिव्ह पे’च्या माध्यमातून चेक क्लिअरिंगला जाण्यापूर्वी त्याचा क्रमांक, चेक जारी करण्यात आल्याची तारीख, चेक देणाऱ्याचे नाव, खाते क्रमांक, रकमेसह अन्य तपशील बँकेतर्फे पुन्हा तपासण्यात येणार आहेत. चेक जारी करणाऱ्याला ज्याच्या नावे चेक देण्यात येणार आहे, त्याची सर्व माहिती द्यावी लागणार आहे. दोघांची माहिती तपासल्यानंतरच बँकेतर्फे चेक क्लिअरिंगची प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार आहे.
ग्राहकाने चेक जारी केल्यानंतर ज्याला चेक द्यायचा आहे, त्याची माहिती एसएमएस, एटीएम अथवा मोबाइल अॅपच्या मदतीने बँकेला कळवायची आहे. पन्नास हजार रुपयांपेक्षा अधिक रकमेच्या चेकबाबतच हे तपशील द्यावे लागणार आहेत. ग्राहकाने जारी केलेला चेक आणि अन्य तपशीलांमध्ये फरक जाणवल्यास त्याची माहिती त्वरित ‘चेक ट्रंकेशन सिस्टीम’ अर्थात सीटीएस बँकेला दिली जाईल. त्याची माहिती चेक जारी करणाऱ्याला आणि चेक ज्याच्या नावे काढण्यात आला आहे, त्याला दिली जाईल.
‘पॉझिटिव्ह पे’चे फायदे काय?‘पॉझिटिव्ह पे’मध्ये अकाउंट क्रमांक, चेकचा क्रमांक, ज्याला चेक द्यायचा आहे त्याचे नाव, रक्कम आणि चेकच्या दोन्ही बाजूंचे फोटो संबंधित बँकेच्या मोबाइल अॅपवर अपलोड करावे लागणार आहेत. ही माहिती भरल्यानंतरच चेक थर्ड पार्टीला द्यावा लागणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार रक्कम हस्तांतर करण्यापूर्वी बँकेचे कर्मचारी चेकची अपलोड केलेली माहिती तपासून पाहणार आहेत. त्यामुळे ग्राहकांची बोगस चेकपासून सुटका होणार आहे. याशिवाय एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी चेक जाण्यासाठी लागणारा वेळही कमी होणार आहे.
यंत्रणा कशी काम करणार?‘पॉझिटिव्ह पे’ ही एक ऑटोमॅटिक कॅश मॅनेजमेंट सेवा असून, चेकशी संबंधित गैरव्यवहारांची तपासणी करते. बँक या माध्यमातून चेक जारी करणारी व्यक्ती वा संस्था आणि चेक ज्याला देण्यात येणार आहे, त्याची तपासणी करते. या दरम्यान काही गडबड आढळल्यास चेक काढणाऱ्यास तो परत केला जातो.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times