करोनावरील हाती येण्याची शुभचिन्हे असण्याच्या पार्श्वभूमीवर मुंबई पालिकेने लसीकरणासाठी पूर्ण तयारी केली आहे. पालिकेने प्रत्येक दिवशी सुमारे १२ हजार मुंबईकरांना लस देण्याचे उद्दिष्ट निश्चित केले आहे. या मोहिमेचा पहिला टप्पा १५ दिवसांत पूर्ण करण्यावरही पालिकेचा भर असेल.
मुंबईत पालिकेकडून हाती घेण्यात येणाऱ्या लसीकरणाकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. ही प्रक्रिया नेमकी कशी होणार याविषयीही समस्त मुंबईकरांमध्ये चर्चा आहे. अशा परिस्थितीत पालिकेची लसीकरणाची तयारी जवळपास पूर्ण झाली असून, मुंबईतील आठ केंद्रांची निवड करण्यात आली आहे. त्याठिकाणीही आवश्यक त्या पायाभूत सुविधा पुरविण्याची लगबग सुरू आहे.
मुख्य म्हणजे, करोनावरील लस पालिकेस उपलब्ध होताच, त्यानंतर केवळ २४ तासांतच प्रत्यक्ष हाती घेतले जाणार आहे. त्यातील पहिल्या टप्प्यात आरोग्य क्षेत्रातील सुमारे सव्वालाख कर्मचाऱ्यांना ही लस दिली जाणार आहे. त्यानंतर पुढील टप्पा हाती घेतला जाणार आहे. दुसऱ्या टप्प्यांत पोलिस कर्मचाऱ्यांसह इतर घटकांतील कर्मचाऱ्यांच्या समावेश आहे. तर, तिसऱ्या टप्प्यांत सुमारे ५० लाख मुंबईकरांना लस दिली जाणार आहे. त्यात ५० वर्षे वयोगटातील ३० लाख नागरिकांचा समावेश असेल. याच टप्प्यात अल्पवयीन मुलांनादेखील लस दिली जाणार असल्याचे पालिका अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.
आठ केंद्रांत तयारी
मुंबई महापालिकेने लसीकरणासाठी आठ केंद्रे सज्ज केली असून त्यापैकी केईएम, नायर, कूपर, सायन रुग्णालयात दररोज सुमारे दोन हजार व्यक्तींना लस दिली जाणार आहे. वांद्रेतील भाभा रुग्णालय, सांताक्रूझ येथील व्ही. एन. देसाई रुग्णालय, घाटकोपरमधील राजावाडी रुग्णालय, कांदिवलीतील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयातील चार केंद्रात दररोज प्रत्येकी एक हजार व्यक्तींना लस दिली जाणार आहे.
केंद्रांची संख्या ५०पर्यंत वाढणार
मुंबईत सध्या आठ लसीकरण केंद्रे असून, प्रत्येक विभागात किमान दोन लसीकरण केंद्रे असावेत, असे पालिकेचे धोरण आहे. या केंद्रांची संख्या हळूहळू ५०पर्यंत वाढवण्यात येणार आहेत.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times