मुंबईः ब्रिटनमध्ये हाहाकार माजवलेल्या करोनाच्या नव्या स्ट्रेनचा आता महाराष्ट्रातही शिरकाव झाला आहे. ब्रिटनमधून राज्यात परतलेल्या ८ जणांमध्ये करोनाच्या नव्या स्ट्रेनची लक्षणं आढळली आहेत. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे.

काही दिवसांपूर्वी ब्रिटनमधून भारतात परतलेल्या रुग्णांमध्ये आढळला होता. मात्र, आता राज्यात करोनाच्या नव्या स्ट्रेनचे रुग्ण आढळल्यानं चिंता अधिक वाढली आहे. तसंच, राज्यातील आरोग्य प्रशासनदेखील अधिक सावध झालं असून या रुग्णांच्या संपर्कात आलेल्या रुग्णांचा शोध घेण्याचा प्रयत्न आरोग्य प्रशासन करत आहे.

ब्रिटनमधून महाराष्ट्रात परतलेल्या ८ प्रवाश्यांपैकी ५ प्रवासी मुंबईतील आहेत. तर, पुणे, ठाणे आणि मीरा- भाईंदरमधील प्रत्येकी एक रुग्णांचा समावेश आहे. या सर्व रुग्णांना विलगीकरण कक्षात ठेवलं आहे, अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली आहे.

दरम्यान, करोना लसीच्या वितरणासाठी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आढावा बैठक घेतली असून राज्यात करोनाच्या नवीन स्ट्रेनची लागण झालेल्या रुग्णांबाबतही चर्चा केली. त्याबाबत आरोग्य विभाग व मनपा आयुक्त यांच्याशी चर्चा केली व अधिक दक्षता घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

नव्या करोनाचा धोका टाळण्यासाठी भारत सरकारकडून २१ डिसेंबरपासून विमानांवर बंदी घालण्यात आली होती. त्यानंतर या कालावधीत भारतात व राज्यात दाखल झालेल्या रुग्णांची आरटी-पीसीआर चाचणी करण्यात येत होती. त्यानंतर रुग्णांच्या चाचणीचे अहवाल करोना स्ट्रेनच्या चाचणीकरता जिनोम सिक्वेन्सिंग केलं जात आहे.

ब्रिटनमध्ये करोनाचा नवा विषाणू आढळला असून, जुन्या करोनापेक्षा हा करोना ७० टक्के अधिक वेगाने फैलावत असल्यामुळे तो अधिक घातक समजला जात आहे. आत्तापर्यंत डेन्मार्क, नेदरलँड, ऑस्ट्रेलिया, इटली, स्वीडन, फ्रान्स, स्पेन, स्वित्झरलँड, जर्मनी, कॅनडा, जपान, लॅबनन, सिंगापूर या देशांत करोनाचा नवा स्ट्रेन आढळला आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here