हैदराबादः भारतात दोन लसींना मंजुरी मिळाल्यानंतर ( covaxin ) त्यावर राजकारण सुरू झालं आहे. दरम्यान, भारत बायोटेकचे एमडी कृष्णा एल्ला यांचं एक मोठं वक्तव्य समोर आलं आहे. काही जण लसीचं राजकारण करत आहे. आपल्या कुटुंबातील कोणताही सदस्य कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंधित नाही. त्यामुळे यावर कोणीही राजकारण करू नये, असं एल्ला म्हणाले.

भारताताच नव्हे, तर आम्ही ब्रिटनसह १२ हून अधिक देशांमध्ये क्लिनिकल चाचण्या घेतल्या आहेत. आम्ही पाकिस्तान, नेपाळ, बांगलादेश आणि अन्य देशांमध्ये क्लिनिकल चाचण्या घेत आहोत, असं एमडी कृष्णा एल्ला यांनी स्पष्ट केलं. भारत बायोटेकच्या ‘कोवॅक्सिन’ला आपत्कालीन वापरासाठी ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने (डीसीजीआय) मंजुरी दिली आहे. पण ही मंजुरी घाईघाईत देण्यात आल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे.

‘लस बनवण्याचा मोठा अनुभव’

केंद्रीय औषध मानक नियंत्रण संस्था (CDSCO) २०१९ च्या अटींच्या आधारे लस मंजुरी दिली आहे. आम्हाला लस बनवण्याचा खूप मोठा अनुभव आहे. आम्ही १२३ देशांसाठी काम करत आहोत. असा अनुभव असणारी आमची एकमेव कंपनी आहे. यामुळे आमच्या लसवर कोणतेही प्रश्न उपस्थित करू नका, असं कृष्णा एल्ला यांनी टीकाकारांना सुनावलं.

आमच्या डेटामध्ये पारदर्शकता नाही, असा आरोप होतोय. पण असे आरोप करणाऱ्यांनी संयम राखला पाहिजे आणि इंटरनेटवरील डेटाशी संबंधित प्रकाशित लेख वाचले पाहिजेत. आतापर्यंत आंतरराष्ट्रीय जर्नल्समध्ये ७० हून अधिक लेख प्रकाशित झाले आहेत, अशी माहिती कृष्णा एल्ला यांनी दिली.

‘अमेरिकेतसुद्धा ही सुविधा नाही’

संपूर्ण जगात फक्त आपल्याकडे बीएसएल -3 उत्पादन सुविधा आहे. ही अभिमानाची बाब आहे. अमेरिकेतही ही सुविधा नाही. जगातील सार्वजनिक आरोग्य आणीबाणीच्या मदतीसाठी आम्ही तयार आहोत, मग तो जगातील कुठलाही भाग असो, असं ते म्हणाले. तिसर्‍या टप्प्यातील चाचणी येत्या दोन-तीन दिवसांत संपेल आणि आकडेवारी फेब्रुवारी किंवा मार्चपर्यंत उपलब्ध होईल, असं कृष्णा एल्ला यांनी सांगितलं.

मर्कच्या इबोला लसीने मानवी क्लिनिकल चाचणी कधीच पूर्ण केली नाही. परंतु डब्ल्यूएचओने लायबेरिया आणि गिनीसाठी या लसीच्या आपत्कालीन प्रयोगांना परवानगी दिली होती. सध्या आमच्याकडे २० कोटी डोस आहेत. चार केंद्रांवर ७ कोटी डोस उत्पादन करण्याची क्षमता निर्माण करण्याचं आमचं लक्ष्य आहे. यातील तीन हैदराबादमध्ये तर एक बंगळुरूमध्ये आहे. सुरवातीला लसची किंमत थोडी जास्त असू शकते, असं कृष्णा एल्ला म्हणाले.

‘शशी थरूर यांनी उपस्थित केले प्रश्न’

भारत बायोटेकच्या कोवॅक्सिनची तिसऱ्या टप्प्यातील चाचण्या अजून बाकी आहे. मग त्यापूर्वी त्याला परवानगी का देण्यात आली? असा प्रश्न कॉंग्रेस नेते आणि माजी केंद्रीय मंत्री शशी थरूर यांनी उपस्थित केला होता.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here