म. टा. प्रतिनिधी, पुणे: करोनाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना मास्क वापरण्याचे; तसेच सार्वजनिक ठिकाणी न थुंकण्याबाबत प्रशासनाकडून वेळोवेळी सूचना देऊनही लाखो लोक बेशिस्तपणे वर्तवणूक करत असल्याचे निदर्शनास आले आहे. या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या आतापर्यंत दोन लाख ७१ हजार नागरिकांवर कारवाई करण्यात आली असून, त्यांच्याकडून सुमारे १८ कोटी ६४ लाख रूपयांचा दंड वसूल ( ) झाला आहे. नियमांचे पालन न करणाऱ्या नागरिकांमध्ये सर्वाधिक नागरिक हे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील असून, त्याखालोखाल पुणे शहरातील नागरिकांचा समावेश आहे.

प्रशासनाकडून सूचना देण्यात येत असतानाही अद्याप अनेक नागरिक मास्क वापरत नसल्याचे आणि सार्वजनिक ठिकाणी थुंकण्याचे प्रकार करत असल्याचे आढळून येत आहे. संबंधित नागरिकांविरूद्ध कारवाई करण्यात येत आहे. दंडाची रक्कम वसूल करण्याचे अधिकार पोलीस, पोलीस मित्र, आरोग्य सेवक, महापालिका कर्मचारी यांना देण्यात आले आहेत. ‘नियमांचे पालन न करणाऱ्यांविरूद्ध कारवाई सुरू आहे. आतापर्यंत जिल्ह्याच्या ग्रामीण भागात सर्वाधिक दोन लाख ३२ हजार ३५० नागरिकांवर कारवाई झाली आहे. संबंधित नागरिकांना सुमारे पाच कोटी २० लाख ४८ हजार ३०७ रुपयांचा दंड झाला आहे. पुणे शहरातील दोन लाख चार हजार ४४४ नागरिकांवर कारवाई झाली आहे. त्यांच्याकडून नऊ कोटी ८३ लाख ५२ हजार रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील ६६ हजार ५६६ नागरिकांवर कारवाई करण्यात आली असून, त्यांच्याकडून तीन कोटी ६० लाख ९० हजार ५०० रुपये दंड वसूल झाला आहे’असे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी सांगितले.

कारवाई आणखी कडक करणार

‘मास्क न वापरणाऱ्या आणि रस्त्यांवर थुंकणाऱ्या नागरिकांवरूद्ध आणखी कडक कारवाई केली जाणार आहे. त्यामुळे नागरिकांनी या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे’ असे डॉ. देशमुख म्हणाले.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here