चार दिवसांनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा आणि देशातील महत्त्वाचे नेते यांच्या दिल्लीतील निवासस्थानाची सुरक्षा पूर्ववत करण्यात आली आहे. पवार यांच्या निवासस्थानाची सुरक्षा हटविण्यात आली नव्हती, असे दिल्ली पोलिसांच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.
पवार यांना देण्यात आलेल्या वाय सुरक्षेअंतर्गत दिल्लीतील त्यांच्या निवासस्थानी केंद्रीय राखीव पोलिस दल आणि दिल्ली पोलिसांचे कर्मचारी सुरक्षारक्षक म्हणून तैनात करण्यात आले होते. पण २० जानेवारीच्या रात्रीपासून या सुरक्षारक्षकांनी कोणतीही पूर्वसूचना न देता येणे बंद केले होते. चार दिवसांनंतर आज ते कामावर परतले. काही सुरक्षारक्षक कामावर का पोहोचले नाहीत, याची चौकशीही सुरू करण्यात आली आहे. चार दिवस सुरक्षा नसल्यामुळे पवार यांच्या निवासस्थानी खासगी सुरक्षारक्षक तैनात करण्यात आले होते.
शरद पवार यांच्या निवासस्थानाची सुरक्षा २० जानेवारी रोजी रात्री हटविली होती. त्यावर दोन दिवस वाद होऊन हा मुद्दा तापल्यानंतर सुरक्षा हटविलीच नाही, असे स्पष्टीकरण शनिवारी दिल्ली पोलिसांनी दिले. नियमांनुसार पवार यांच्या निवासस्थानी दिल्ली पोलिसचे कर्मचारी पूर्वीप्रमाणेच पुरेशा संख्येने तैनात असल्याचे दिल्ली पोलिसांनी स्पष्ट केले. पवार यांच्या निवासस्थानी प्रवेशद्वारावरील तीन रक्षक आणि एका अंगरक्षकासह एकूण दहा सुरक्षारक्षक तैनात असतात.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times