औरंगाबाद शहराच्या नामांतराचा मुद्दा सध्या राज्यात गाजत आहे. औरंगाबादचं नामांतर संभाजीनगर करण्यासाठी शिवसेनेकडून पावलं उचलली जात असतानाच महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या काँग्रेसनं मात्र नामांतरासाठी ठाम विरोध केला आहे. त्यातच आता प्रकाश आंबेडकर यांनी औरंगाबाद ऐवजी पुणे जिल्ह्याचं नाव संभाजीनगर करा, अशी मागणी त्यांनी केली आहे.
‘औरंगाबाद ऐवजी पुण्याला संभाजी महाराजांचे नाव द्या. संभाजी महाराज यांच्यावर पुणे जिल्ह्यात अंत्यसंस्कार झाले आहेत. पुणे जिल्ह्यात त्यांची समाधी आहे. त्यामुळं संभाजी महाराजांचं स्मरण राहावं, असं वाटत असेल तर ती योग्य भूमी पुणे आहे. त्यामुळं पुण्याला संभाजी महाराजांचे नाव दिलं तर अधिक योग्य होईल,’ अशी भूमिका प्रकाश आंबेडकर यांनी मांडली आहे. एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.
‘औरंगाबाद हे ऐतिहासिक शहर आहे आणि ऐतिहासिक राहायला हवं. मुघलांच्या काळात औरंगाबाद राजधानी होती,’ असंही ते म्हणाले आहेत. तसंच, ‘पाच वर्ष सरकारमध्ये असताना भाजप- शिवसेनेनं औरंगाबाद शहराचं नाव का बदललं नाही?,’ असा सवाल त्यांनी केला आहे.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times