म.टा. प्रतिनिधी, नगर: ‘औरंगाबाद शहराचे नामांतर संभाजीनगर करण्‍यास आमचा पाठिंबा आहे. कारण स्वतंत्र भारतात परकीयांची नावे पुसली पाहिजेत, हीच आमची भूमिका आहे,’ असे मत विश्व हिंदू परिषदेचे अखिल भारतीय संयुक्त मंत्री दादाजी वेदक यांनी व्यक्त केले. ते नगरमध्ये बोलत होते.

नगरमध्ये आज, मंगळवारी विश्व हिंदू परिषदेची पत्रकार परिषद झाली. यावेळी वेदक यांनी औरंगाबाद शहराच्या नामांतर याविषयी आपली भूमिका मांडली. या पत्रकार परिषदेला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पश्चिम महाराष्ट्र प्रांत संघचालक नाना जाधव, विश्व हिंदू परिषदेचे प्रांत सहमंत्री विवेक कुलकर्णी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे शांतीभाई चंदे, हभप रामदास महाराज क्षीरसागर, श्रीकांत जोशी, गजेंद्र सोनवणे, अनिल रामदासी, राजेश झंवर, ॲड.जय भोसले, निलेश लोढा, कुलदीप कुलकर्णी आदी उपस्थित होते.

औरंगाबाद शहराचे नामांतर संभाजीनगर केले जावे, अशी मागणी पुढे आली असून त्यावरून वाद सुरू झाला आहे. याबाबत विश्व हिंदू परिषदेची भूमिका काय? असे वेदक यांना विचारले असता, ते म्हणाले, ‘औरंगाबादचे नाव संभाजीनगर व्हावे, यासाठी आमचा पाठिंबा असेलच. कारण स्वतंत्र भारतात परकीयांची नावे पुसली पाहिजेत, ही आमची भूमिका आहे. तसंच ‘अहमदनगर’ शहराचे सुद्धा नाव ‘नगर’ असावे असे आमचे मत आहे.’

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here