म. टा. खास प्रतिनिधी, मुंबईः कार घेऊन घराबाहेर पडले नसतानाही प्रसिद्ध उद्योगपती यांना वाहतुकीचे नियम मोडल्याची एकापाठोपाठ एक इ चलन येत होती. याबाबत तक्रार येताच वाहतूक पोलिसांनी शहानिशा केली असता टाटांच्या गाडीचा नंबर वापरून दुसराच कुणी नियम मोडत असल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे या व्यक्तीला ताब्यात घेतल्यानंतर अंकगणित शास्त्रानुसार नंबर बदलल्याचे उत्तर त्याने दिले.

हा प्रकार उघड होताच वाहचालकावर माटुंगा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. इतकंच नाही तर इ चलनाच्या थकीत दंडाची रक्कमही वसूल करण्यात आली.

मुंबईत एक वाहनचालक डुप्लिकेट नंबर प्लेट वापरत असल्याची तक्रार मुंबई पोलिसांच्या वाहतूक शाखेकडे आली. नंबरवरून ही गाडी रतन टाटा यांच्या मालकीची असल्याचे समोर आले. टाटांच्या गाडीच्या क्रमांकाचा गैरवापर केला जात असल्याचे लक्षात येताच वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुनील काळे, सहायक निरीक्षक संदीप फणसे यांच्यासह अजीज शेख यांनी या गाडीचा शोध घेण्यास सुरुवात केली.

मुंबईत लावण्यात आलेल्या सीसीटीव्हींच्या आधारे माग घेत या वाहनाचा शोध लावण्यात आला. ही कार मेसर्स नरेंद्र फॉर्वर्डेस प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या नावे असल्याचे उघड झाले. पोलिसांनी या कंपनीच्या संचालिकेविरोधात माटुंगा पोलिस ठाण्यात भादंवि कलम ४२०, ४६५ तसेच केंद्रीय मोटार परिवहन कायद्यांतंर्गत गुन्हा दाखल केला. संचालिकेची चौकशी केली असता तिची अंकशास्त्रावर श्रद्धा असून त्यातूनच मूळ क्रमांक बदलून टाटांच्या गाडीचा क्रमांक वापरला जात होता. वाहतुकीचे नियम मोडल्याप्रकरणी जी इ चलन तयार झाली आहेत ती टाटांच्या क्रमांकावरून या कंपनीच्या वाहनाच्या मूळ क्रमांकावर वर्ग करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here