नवी दिल्लीः भारत सरकारने मंजुरी दिलेल्या करोनावरील लसींमध्ये डुकराच्या मांसचा अंश नाही. या अफवांवर विश्वास ठेवू नका आणि अशा अफवा निराधार आणि मूर्खपणाच्या आहेत, असं भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेचे ( ICMR) माजी प्रमुख डॉ. रमण गंगाखेडकर यांनी स्पष्ट केलंय.

करोनाविरोधी लढाईत डॉ. रमण गंगाखेडकर यांची मोठा चेहरा ठरले आहेत. लॉकडाऊन दरम्यान डॉ. गंगाखेडकर सतत करोनाशी संबंधित अपडेट देत होते. करोना लसीशी संबंधित सोशल मीडियावरील मेसेज सत्यता तपासल्याशिवाय पुढे पाठवू नका, असं गंगाखेडकर म्हणाले.

लस मंजूर करण्यासाठी एक यंत्रणा तयार केली गेली आहे हे नागरिकांना समजलं पाहिजे. सखोल विचार केल्यावरच त्यांना मंजुरी देण्यात आली आहे. ही लस घेण्यास नकार देणाऱ्यांनी असा विचार करावा. केवळ त्यांनाच नव्हे तर त्यांच्या कुटुंबीयांनाही नुकसान सहन करावं लागू शकतं. त्यांचे नातेवाईक आणि मित्रही अडचणीत येऊ शकतात, असं त्यांनी सांगितलं.

आतापर्यंत जगभरात सुमारे एक कोटी नागरिकांना लस देण्यात आल्या आहेत. पण यामुळे कुणाचाही मृत्यू झालेला नाही. काही जणांना त्रास झाला. पण या अडचणींवर मात करण्यात आली. पण लोकांनी अशा घटना लक्षात ठेवल्या तर त्यांना समस्या उद्भवतील, असं ते म्हणाले.
सोशल मीडियातील मेसेजबाबत त्यांनी सावध केलं. आपल्याकडे काही संशयास्पद संदेश असल्यास आपण करोना हेल्पलाईनवर कॉल करून तिची सत्यता तपासू शकता. त्यानंतरच ते शेअर करा, असं आवाहन त्यांनी केलं.

लसमध्ये डुकराच्या मांसाचे अंश आहे, असं बऱ्याच ठिकाणी बोललं जातंय. पण ते पूर्णपणे चुकीचं आहे, भारत सरकारने मंजुरी दिलेल्या दोन्ही लसींमध्ये असं काहीही नाही. तसंच नपुंसकत्व संबंधितही अफवा आहेत, असं त्यांनी सांगितलं. लस घेणारे नपुंसक होतील, असा दावा केला जातोय. पण त्याला कुठलाही आधार नाही आणि यामुळे कुणीही नपुंसक होणार नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं.

अफवांवर विश्वास ठेवू नका. सोशल मीडियातील चुकीचे मेसेज कुणाला पाठवू नक आणि अचूक माहितीच द्या, असं आयसीएमआरचे माजी प्रमुख डॉ. रमण गंगाखेडकर म्हणाले.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here