‘निवडणूका जवळ आल्या आहेत त्यामुळं शिवसेना व काँग्रेस हे ठरवून करत आहे. शिवसेनेनं आता औरंगाबादचे संभाजीनगर करा असं म्हणायचं म्हणजे त्यांना असं वाटतं त्यांचे मतदार खूष होतील. काँग्रेसने ते करु नका असं म्हणायचं म्हणजे त्यांना वाटतं त्यांचे मतदार खुश होतील. यावरुन हे स्पष्टपणे लक्षात येतंय की निवडणुका आल्यामुळं ही नुरा कुस्ती या ठिकाणी सुरु झाली आहे. मला असं वाटतं की हे केवळ नाटक सुरु आहे,’ असा घणाघात देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.
‘मी मुख्यमंत्री असताना औरंगाबाद रस्त्यासाठी पैसे दिले. पण महानगरपालिकेनं ते पैसे वेळेत खर्च केले नाहीत. १०० कोटी देतो असं सांगितलं होतं. पण ते आधीचे पैसे खर्च करु शकले नाहीत. १६०० कोटी रुपये पिण्याच्या पाण्याच्या योजनेसाठी दिले होते. इतक्या दिवसानंतर आता त्याची कामाची ऑर्डर निघाली आहे. हे काम आतापर्यतं कितीतरी पुढं जायला हवं होतं. त्यामुळे औरंगाबादमध्ये इतके वर्ष सत्ता चालवून देखील, कुठलही महत्वाचं कार्य करता न आल्याने आता अशाप्रकारची भाषा सुरू आहे. निवडणुकीला डोळ्यासमोर ठेवूनच हे सर्व सुरू आहे.’ असा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.
‘भाजपनं औरंगाबाद पालिकेत चार वेळा नामांतराचा प्रस्ताव दिला आहे. पण शिवसेनेनं हा प्रस्ताव दाखल करुन घेतला नाही. बोर्डावरही हा प्रस्ताव आणला नाही. औरंगाबाद नामांतराचं शिवसेनेच्या मनात होतं तर प्रस्ताव पुढे का आला नाही?,’ असा सवालही त्यांनी केला आहे.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times