म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई

लसीकरणासाठी वैद्यकीय तज्ज्ञांसह वैद्यकीय कर्मचाऱ्यांना प्राधान्य देण्यात येणार आहे. लस केव्हा येणार आणि ती घेण्यापूर्वी कोणत्या निर्देशांचे पालन करायचे, अशा विविध मुद्द्यांवर वैद्यकीय कर्मचाऱ्यांमध्ये मंगळवारी चर्चा झाली. लस घेण्यावरून दोन प्रकारचे मतप्रवाह त्यांच्यामध्ये होते. काही जणांनी लस घेतल्यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढेल व करोनापासून संरक्षण मिळेल त्यामुळे लस घेणे योग्य असल्याचे सांगितले; तर रुग्णालयातील काही कर्मचाऱ्यांनी जे लस घेतील त्यांच्यामध्ये त्याचे कोणते परिणाम दिसतात, यावर लस घ्यायची की नाही हा निर्णय ठरेल, असेही सांगितले. पालिका प्रशासनाने वा सरकारनेही हे लसीकरण बंधनकारक केलेले नाही, त्यामुळे लस घेण्यापूर्वी यासंदर्भातील सर्व वैद्यकीय बाबींचा विचार करण्यात येईल असा मतप्रवाह व्यक्त होत आहे.

केईएम रुग्णालयातील वरिष्ठ परिचारकांनी रुग्णालयातील वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी लसीकरणासाठी नोंदणी केली आहे. त्यांच्या मनामध्ये कोणतीही द्विधा नाही. आरोग्य कर्मचाऱ्यांनी स्वतःहून यासाठी पुढाकार घ्यायला हवा, तरच हे लोकहिताचे काम पूर्णत्वास जाऊ शकेल. सरकारने विविध पातळ्यांवर तपासण्या केल्यानंतर हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे घाबरण्याचे कारण नाही, असेही त्या म्हणाल्या. लस घेतल्यानंतर शरीरामध्ये करोना विषाणूच्या विरोधात प्रतिकारशक्ती तयार होईल. त्यामुळे संसर्गाचे प्रमाण नियंत्रणात राहण्यास मदत होईल. मृत्युदरही निश्चितपणे कमी होईल. त्यामुळे लसीकरणामध्ये सहभागी व्हायला, असेही पालिका रुग्णालयातील काही कर्मचाऱ्यांचे मत आहे.

विमायोजना, सुरक्षेचा मुद्द्यासंदर्भात प्रश्न

लसीकरणाच्या पूर्वी आरोग्य कर्मचाऱ्यांनी मनात असलेल्या सर्व प्रश्नांचे निराकरण करायला हवे, अशी इच्छा व्यक्त केली. आरोग्य कर्मचारी संघटनेचे प्रमुख प्रकाश देवदास यांनी, थांबा पाहू! असा पवित्रा अनेक जणांनी घेतल्याचे सांगितले. ही मोहीम अधिक बळकट करण्यासाठी सातत्याने चर्चा व्हायला हवी, अशी अपेक्षा व्यक्त केली. लस घेतल्यानंतर दुष्परिणाम उद्भवल्यास त्याची जबाबदारी कोण घेणार? परतावा किती मिळणार? असेही मुद्दे उपस्थित केले जात आहे. करोना सेवेमध्ये काम केल्याबद्दल सरकारने विमा योजनेची खात्री दिली आहे. लसीकरणामध्ये ही ग्वाही मिळेल का, असाही विचार कर्मचाऱ्यांच्या मनामध्ये आहे.

लसीकरण ऐच्छिक

पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांच्याकडे यासंदर्भात विचारणा केल्यानंतर त्यांनी, लसीकरण हे ऐच्छिक आहे त्यामुळे कुणालाही जबरदस्ती करणार नाही. मात्र, आरोग्याच्या दृष्टिकोनातून लसीकरणाच्या प्रक्रियेकडे सकारात्मकरित्या पाहायला हवे, याकडे त्यांनी लक्ष वेधले. आरटीपीसीआर चाचण्यांच्या संदर्भातही पहिल्या टप्प्यांत अनेक प्रकारचे प्रश्न होते. हळूहळू हा प्रतिसाद वाढत गेला. लस अद्याप आलेली नाही, त्यामुळे कोणती लस द्यायचे हे ठरले नाही. ही प्रक्रिया सुरू झाल्यानंतर त्यांचा आत्मविश्वास वाढेल, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

आरोग्य कर्मचारी म्हणतात…

– रोगप्रतिकारशक्ती वाढेल आणि करोनापासून संरक्षण होईल त्यामुळे लस घेणे योग्य

– लस घेणाऱ्यांवर कोणते परिणाम दिसतात, यावर लस घ्यायची की नाही त्याचा निर्णय

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here