मुंबई : नव्या करोनाने निर्माण झालेल्या अनिश्चित वातावरणात तेजीने झळाळून निघालेल्या सोने आणि चांदीमध्ये आज बुधवारी नफावसुली सुरु आहे. कमॉडिटी बाजारात सध्या सोने आणि चांदीच्या दरात अनुक्रमे १६० रुपये आणि ४५० रुपयांची घसरण झाली आहे. गेल्या दोन सत्रात जवळपास ३००० रुपयांनी वधारला होता.

सध्या मल्टी कमॉडिटी एक्सचेंजमध्ये सोन्याचा भाव प्रती १० ग्रॅम ५१५६० रुपये आहे. त्यात १६० रुपयांची घसरण झाली. चांदीमधील भाववाढीला नफेखोरीची झळ बसली आहे. गेल्या दोन सत्रात सोने १५०० रुपयांनी तर चांदीचा भाव जवळपास ३००० रुपयांनी वधारला होता. तो आता कमी झाला आहे. सध्या एक किलो चांदीचा भाव ७०४०७ रुपये असून त्यात ४५१ रुपयांची घसरण झाली आहे.

सराफा बाजारात देखील सोने आणि चांदीमध्ये तेजी दिसून आली. मंगळवारी दिल्लीतील सराफा बाजारात सोन्याचा भाव ५०९६९ रुपये होता. त्यात ३३५ रुपये वाढ झाली होती. रुपयाचे डाॅलरसमोर अवमूल्यन झाल्याने सोन्याच्या किंमतींवर परिणाम झाला. जागतिक बाजारात मागील वर्षात सोने दरात सरासरी २५ टक्के वाढ झाली आहे. करोना संकट आणि लॉकडाउन या काळात सोने प्रचंड तेजीत होते. अमेरिकेत नव्या करोनाचा फैलाव वाढत आहे. ब्रिटनमध्ये लॉकडाउन जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे गुंतवणूकदार करोना प्रतिबंधात्मक लसीकरणाकडे डोळे लावून आहेत.

आज जागतिक बाजारात सोन्याचा भाव १९४९.०७ डॉलर प्रती औंस आहे. त्यात कोणताही बदल झाला नाही. याआधी ९ नोव्हेंबर रोजी सोन्याचा भाव १९५२.३६ या उच्चांकी स्तरावर होता. चांदीचा भाव प्रती औंस २७.३९ डॉलर होता.डॉलर इंडेक्समध्ये घसरण पाहायला मिळाली.

good returns या वेबसाईटनुसार बुधवारी मुंबईत २२ कॅरेट सोन्याचा भाव ५०३४० रुपये झाला आहे. त्यात मंगळवारच्या तुलनेत २० रुपयांची वाढ झाली. मुंबईत २४ कॅरेट सोन्याचा भाव ५१३४० रुपये आहे. दिल्लीत २२ कॅरेट सोन्याचा भाव ५०१६० रुपये आहे. २४ कॅरेटसाठी तो ५४७१० रुपये आहे. चेन्नईत २२ कॅरेटसाठी ४८५७० रुपये असून २४ कॅरेटचा भाव ५२९६० रुपये आहे. कोलकात्यात २२ कॅरेट सोन्याचा भाव ५०५७० रुपये असून २४ कॅरेट सोन्याचा भाव ५३२७० रुपये आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here