म. टा. प्रतिनिधी, : लोणी काळभोर येथील पेट्रोल पंपावर दरोडा टाकून रांजणगाव येथील खासगी कारचालकाची गाडी चोरून नेत असताना कारचालकाने विरोध केला असता कोयता गँगने कोयता व दगडाने ठेचून कारचालकाचा खून केल्याची घटना घडली. त्यानंतर त्यांच्याच कारच्या डिकीत मृतदेह ठेवून पुढे मुळा-मुठा नदीत टाकून दृश्यम चित्रपटासारखा पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याचे समोर आले. या प्रकरणी लोणी काळभोर पोलिस ठाण्यात दरोड्याचा, तर रांजणगाव पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे.

योगेश मच्छिंद्र गर्जे (वय २५, रा. रांजणगाव, ता. शिरूर) असे रांजणगावाच्या हद्दीत खून झालेल्या कारचालकाचे नाव आहे. पेट्रोल पंपावर जखमी झालेला कामगार चेतन सुनील जाधव (वय २३, रा. पाषाणकर बाग, लोणी काळभोर, ता. हवेली) याने लोणी काळभोर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

या घटनेतील कोयता गँगचे किरण भाऊसाहेब थिटे (वय २१, रा. केंदूर, ता. शिरूर), गौरव बाळू ढवळे (वय २१, रा. खोप वस्ती, अष्टापूर, ता. हवेली), संतोष गोरख ब्राम्हणे (वय २०, रा. शनिशिंगणापूर, ता. नेवासा), भाऊसाहेब गौतम कुडुक (वय २२, रा. शेकटा, जिल्हा परिषद शाळेजवळ, ता. गेवराई), दक्षिणेश उर्फ दर्शन अनिल दांगट (वय २१, रा. उंब्रज, दांगट पट, ता. जुन्नर) यांना ग्रामीण गुन्हे शाखेने अटक केली.

ग्रामीण गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक पद्माकर घनवट यांनी दिलेल्या माहितीनुसार, लोणी काळभोर बोरकर मळा येथील पेट्रोल पंपावर २८ डिसेंबर रोजी रात्री तीनच्या दरम्यान पाच अज्ञात व्यक्तींनी कोयते आणि लाकडी दांडके घेऊन पेट्रोल पंपावरील काम करणाऱ्या कामगारांना धमकी देऊन मारहाण केली. ऑफिसमधील कम्प्युटर व काचा फोडून ३९ हजार ५०० रुपये चोरून नेले. त्यानंतर पुढे पळून जाण्यासाठी रांजणगाव येथील योगेश मचिंद्र गर्जे (वय २५, रा. रांजणगाव ता. शिरूर) याची गाडी तीन जानेवारीला बोलावून घेतली. त्यानंतर आरोपींनी वणी येथे फिरायला जाण्याचे नाटक केले आणि गाडी चोरून नेण्याचा प्रयत्न केला. गाडीचालक योगेशने विरोध केला असता, त्याचा खून करण्यात आला. या खुनाचा तपास लागू नये म्हणून आरोपींनी योगेशचे प्रेत गाडीच्या डिक्कीमध्ये ठेवले आणि त्यानंतर भवरापूर येथील मुळा-मुळेवर असणाऱ्या पुलावरून फेकून दिले.

योगेश गर्जेंशी संपर्क होत नसल्याने त्यांच्या नातेवाइकांनी रांजणगाव पोलिसांकडे ते हरवल्याची तक्रार दिली. त्यानंतर सोमवारी सायंकाळी अष्टापूर रस्ता येथील मुळा-मुठा नदीमधून मृतदेह बाहेर काढण्यास ग्रामीण पोलिसांना यश आले. आरोपींनी चोरून नेलेली कार शिरूर येथे सापडली. फरारी आरोपी रांजणगाव राजमुद्रा चौक येथे येणार असल्याची खबर पोलिसाना मिळाल्यावर पोलिसांनी सापळा रचून त्यांना अटक केली.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here